बेळगाव :
हिंडलगा, मांजरेकर कॉलनी, नवीन वसाहत येथील रहिवासी व सीआरपीएफचे जवान संजय परसू कांबळे (वय 45 मुळगाव सुंडी, ता. चंदगड) यांचे तेलंगणा येथे सेवा बजावत असताना दि. 23 रोजी हृदयविकाराने निधन झाले. वीर जवान संजय कांबळे अमर रहे, अमर रहे, वंदे मातरम् अशा घोषणा देत देशभक्तीपर गीते लावून अंत्ययात्रा काढून त्यांच्यावर सुंडी येथे शनिवार दि. 24 रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. संजय यांचे पुतणे प्रशांत यांनी त्यांना भडाग्नी दिली. यावेळी चंदगडचे आमदार राजेश पाटील, तहसीलदार विनोद रणावरे, पोलीस उपअधिक्षक गणेश इंगळे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हणमंत नाईक यांच्यासह सीआरपीएफचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून पुष्पचक्र अर्पण केले.
संजय हे केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) हवालदार म्हणून कार्यरत होते. 1994 साली सांगली येथे भरती झाले होते. त्यांचे शुक्रवारी दि. 23 रोजी भद्राचलम (तेलंगणा) येथे सेवा बजावत असताना दुपारी 12 वाजता हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई, भाऊ असा परिवार आहे. गारगोटी प्रांत कार्यालयात कर्मचारी सोमाना कांबळे यांचे कनिष्ठ बंधू होते.