प्रतिनिधी /म्हापसा
सुकूर पंचायतीची निवड होऊन अनिल पेडणेकर यांची सरपंचपदी तर उपसरपंचपदी रेश्मा मोरजकर यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. ही पंचायत आता भाजपच्या हातून निसटली असून यावर स्थानिक आमदार रोहन खंवटे यांनी आपला कबजा केला आहे.
सुकूर पंचायतीच्या 6 सदस्यांनी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले सरपंच संदीप वझरकर यांच्यावर अविश्वास व्यक्त करणारे पत्र दाखल केले होते. अविश्वास ठरावावर पंच सदस्य अनिल पेडणेकर, संजय पेडणेकर, संदीप मांजरेकर, रवळू पार्सेकर, रेश्मा मोरजकर आणि माया केणी यांच्या स्वाक्षऱया आहेत. सरपंचांनी गावातील विकास कामांमध्ये इतर सदस्यांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करतानाच हे पत्र गटविकास अधिकारी बारदेज यांना देण्यात आले. सुकूर गावच्या हद्दीत होत असलेल्या बेकायदा बांधकाम आणि जमीन बळकावण्यावर कारवाई करण्यात सरपंच अपयशी ठरले.
दरम्यान यावेळी बोलताना नवनिर्वाचित सरपंच अनिल पेडणेकर यांनी सर्वांना विश्वासात घेऊन सुकूर पंचायत क्षेत्रातील विकास साधण्यास आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. गावचा चौफेर विकास हेच आपले ध्येय असून स्थानिक आमदार रोहन खंवटे यांच्या सहकार्याने आम्ही पुढे जाऊ असे ते म्हणाले. विरोधकांनी ही पंचायत होऊ नये म्हणून खूप डाव खेळले मात्र त्यांना यश आले नसल्याचे त्यांनी सांगितले. उपसरपंच रेश्मा मोरजकर यांनी सर्वांना बरोबरीने घेऊन आमदार खंवटेच्या सहकार्याने गावचा विकास करू असे सांगितले.