वृत्तसंस्था/ नोएडा
काही वर्षांपूर्वी 251 रुपयांमध्ये अँड्राईड स्मार्टफोन विकण्याच्या नावाखाली शेकडो लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगवारी केलेल्या मोहित गोयलने आता सुकामेवा खरेदी करण्यारी कंपनी सुरू करून 200 कोटी हडपले आहेत. नोएडा पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपाप्रकरणी दुबई ड्रायप्रूटस कंपनीचे प्रवर्तक मोहित गोयल आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश जांगिड यांना अटक केली आहे. आरोपींनी नोएडा आणि गुरुग्राममध्ये 4 विविध नावांनी बनावट कंपन्या निर्माण करत विविध जणांकडून सुकामेवा खरेदी करून त्याची रक्कम दिली नव्हती. याप्रकरणातील 12 आरोपी फरार आहेत.
हे आरोपी देशभरातील विविध कंपन्यांशी संपर्क साधून सुकामेवा, डाळी, तेल आणि मसाले खरेदी करत होते. विश्वास संपादित करण्यासाठी ते काही रक्कम आगाऊ स्वरुपात देत होते. पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी सुमारे 1000 हून अधिक जणांची 200 कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. तर ही फसवणूक 500 कोटी रुपयापर्यंतची असण्याची शक्यता आहे.
मोहित गोयलने 2017 पासून हा गोरखधंदा सुरू केला होता. प्रत्येक नव्या कंपनीत प्रवर्तक आणि व्यवस्थापकीय संचालकासह कार्यालयाचे ठिकाणही बदलण्यात येत होते. एका कार्यालयाचे भाडे 3 लाख रुपये होते. तर तेथे तीन विदेश महिलांना रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला ठेवण्यात आले होते. गुंतवणूक करण्यासाठी आलेल्या लोकांना बहुराष्ट्रीय कंपनीचा आभास व्हावा यासाठी विदेशी महिलांची निवड करण्यात आली होती.
फसवणुकीच्या प्रकरणी देशभरातून तक्रारी प्राप्त होत आहेत. नोएडा, दिल्ली, गुरुग्राम, जयपूर, हैदराबाद, केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, मध्यप्रदेश, शिमला, तेलंगणामधूनही तक्रारी पोलिसांनी प्राप्त झाल्या आहेत.