वृत्तसंस्था/ अलुर
रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीतील लढतीच्या दुसऱया दिवशी सुदीप घरामी (186) व अनुष्टुप मजुमदार (117) यांची शानदार शतके आणि मनोज तिवारी व अभिषेक पोरेल यांच्या अर्धशतकांमुळे बंगालने झारखंडविरुद्ध खेळताना 5 बाद 577 धावांचा डोंगर उभारला.
तिवारीने नाबाद 54 तर पोरेलने 68 धावांचे योगदान दिले. पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे सुदीप घरामीला मात्र द्विशतकापासून वंचित रहावे लागले. चेंडूला बॅटचा स्पर्शही झाला नव्हता, तरीही पंचांनी त्याला झेलबाद दिले. त्याने 380 चेंडूत 186 धावा जमविताना 21 चौकार, एक षटकार नोंदवताना मजुमदारसमवेत दुसऱया गडय़ासाठी 243 धावांची भागीदारी केली. पहिल्या दिवशी 41 धावांवर निवृत्त झालेल्या अभिषेक रमनने 61 धावा जमविल्या तर पोरेलने 111 चेंडूत 11 चौकारांसह 68 धावांचे योगदान दिले.
मध्यप्रदेशची पंजाबवर 19 धावांची आघाडी, शुभमचे नाबाद शतक
अलुरमध्येच सुरू असलेल्या अन्य एका सामन्यात मध्यप्रदेशने पहिल्या डावात 99 षटकांत 2 बाद 238 धावा जमवित पंजाबवर 19 धावांची आघाडी घेतली आहे. पंजाबने पहिल्या डावात 219 धावा जमविल्या. मध्यप्रदेशच्या शुभम शर्माने नाबाद 102 धावा जमविल्या तर हिमांशू मंत्रीने 89 धावा काढल्या. या जोडीने दुसऱया गडय़ासाठी 120 धावांची भागीदारी केली. दिवसअखेर शुभमच्या साथीला रजत पाटीदार 20 धावांवर खेळत होता.
संक्षिप्त धावफलक ः पंजाब प.डाव 219, मध्यप्रदेश प.डाव 99 षटकांत 2 बाद 238 (शुभम शर्मा खेळत आहे 102, हिमांशू मंत्री 89, मयांक मार्कंडे 2-70).