मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही : वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालय, डेडिकेटेड कोविड सेंटरचे ऑनलाईन लोकार्पण
प्रतिनिधी / वेंगुर्ले:
जनतेचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आमचा विशेष लक्ष आहे. सिंधुदुर्गातील आरोग्य विभागातील रिक्त पदे तसेच आरोग्यविषयक ज्या काही समस्या आहेत, त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले. वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालय व डेडिकेटेड कोविड सेंटरच्या ऑनलाईन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. येथील 50 खाटांच्या नवीन उपजिल्हा रुग्णालय इमारतीचे व 25 खाटांच्या कोरोना सेंटरचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील, माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, जि. प. अध्यक्षा संजना सावंत, खासदार नारायण राणे, आमदार वैभव नाईक, बाळाराम पाटील, निरंजन डावखरे, अनिकेत ताटकरे, नीतेश राणे, आरोग्यसेवा आयुक्त डॉ. रामास्वामी, आरोग्य सेवा संचालक साधना तावडे, उपसंचालक अनिल माळी, वेंगुर्ले सभापती अनुश्री कांबळी, उपसभापती सिद्धेश परब आदी ऑनलाईन, तर खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. महेश खलिपे, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, बाळा दळवी, शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, शहरप्रमुख अजित राऊळ, विवेकानंद आरोलकर, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, वेंगुर्ले तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, सुकन्या नरसुले, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अतुल मुळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर-सामंत, कार्यकारी अभियंता श्रीकांत माने, प्रभारी गटविकास अधिकारी विद्याधर सुतार, नगरसेवक संदेश निकम, सुमन निकम, डॉ. प्रल्हाद मणचेकर आदी उपस्थित होते.
आरोग्यविषयक सुविधा कमी पडू देणार नाही!
ठाकरे पुढे म्हणाले, निवडणुका जवळ आल्या की विविध विकासकामांची भूमिपूजने केली जातात. निवडणुका संपल्यावर त्याकडे दुर्लक्ष केले जाते. आपली ती परंपरा नाही. आम्ही कामाला सुरुवात करताना ते पूर्ण होणार की नाही, याकडे प्रथम पाहतो. 26 जानेवारी 2018 रोजी आपण या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन केले होते. आज त्याचे लोकार्पण होत आहे. जिल्हय़ातील आरोग्यविषयक ज्या काही समस्या असतील, त्या दूर करु. कोकणपट्टा आनंदी व समाधानी करू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त करून रुग्णालयाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी सहकार्य करणाऱया सर्वांना त्यांनी धन्यवाद दिले.
सेंट लुक्स हॉस्पिटल शासनाने ताब्यात घ्यावे – पालकमंत्री
यावेळी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, आजचा दिवस वैद्यकीय क्षेत्रामध्ये क्रांती घडवणारा तसेच वेंगुर्लेकरांसाठी भाग्याचा आहे. सात कोटीच्या या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन तसेच लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यामुळे येथील नागरिकांना आता चांगल्या प्रकारची वैद्यकीय सेवा मिळणार आहे. एकेकाळी जिल्हय़ातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेले येथील सेंट लुक्स हॉस्पिटल आज भग्नावस्थेत आहे. सदर हॉस्पिटलला नवसंजीवनी देण्यासाठी शासनाने हे हॉस्पिटल खास बाब म्हणून ताब्यात घ्यावे, अशी मागणी यावेळी सामंत यांनी मुख्यमंत्र्याकडे केली.
शासकीय महाविद्यालय यावर्षीच सुरू व्हावे – खासदार राऊत
ऐतिहासिक परंपरा असलेल्या वेंगुर्ले तालुक्यात आज 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. आज जिल्हय़ात डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱयांची संख्या कमी असूनही येथील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी आरोग्यविषयक सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. सिंधुदुर्गसाठी तज्ञ डॉक्टर देण्यात यावेत तसेच येथील रिक्त आरोग्य पदे भरण्यात यावीत व शासकीय महाविद्यालय यावर्षाच सुरू करण्यात यावे, अशी मागणी यावेळी खासदार राऊत यांनी केली.
शंभर बेडच्या रुग्णालयास मंजुरी द्यावी- केसरकर
मुख्यमंत्री महोदयांनी आरोग्य, महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री यांची एकत्रित बैठक घेऊन सिंधुदुर्ग जिल्हय़ातील अन्य तीन रुग्णालये सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत. सिंधुदुर्गसाठी वेगळा विभाग व्हावा. येथील उपजिल्हा रुग्णालयात 50 खाटा व ग्रामीण रुग्णालयात 25 खाटांचे हॉस्पिटल झाले आहे. येथे 100 बेडच्या रुग्णालयास मंजुरी देण्यात यावी. तसेच सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने येथे मेडिकल टुरिझमला वाव आहे. त्यामुळे येथील सेंट लुक्स हॉस्पिटल ताब्यात घेऊन तेथे मेडिकल टुरिझम सुरू करावे, अशी मागणी यावेळी आमदार केसरकर यांनी केली.
आरोग्यविषयक प्रश्न निश्चित सोडवू – टोपे
आरोग्य हा मुख्यमंत्र्यांचा आवडीचा विषय आहे. त्यामुळेच आज आरोग्य सुविधांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आज अनेक चांगली कामे करण्याची संधी आपणाला मिळत आहे. त्यामुळे येथील रिक्त पदांचा प्रश्न निश्चितच सोडवू. तसेच जिल्हय़ासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात येतील, असे यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले
यावेळी बांधकाम ठेकेदार ए. एस. जुवेकर व सार्वजनिक बांधकाम अभियंता श्रीकांत माने यांचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वागत जिल्हा शल्यचिकित्सक पाटील, प्रास्ताविक जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले. सूत्रसंचलन सचिन वालावलकर यांनी केले, तर आभार प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल मुळे यांनी मानले.