स्वतः खुनाची कबुली दिल्यानंतर दोघेही गजाआड : कर्लीज क्लबमध्ये ड्रग्जद्वारे केला विषप्रयोग,खुनाला वाचा फुटली तरी हेतु अद्याप अस्पष्ट
प्रतिनिधी /म्हापसा
हणजूण येथे दोन दिवसांपूर्वीच मृत्यू झालेल्या प्रसिद्ध अभिनेत्री तथा भाजपच्या हरियाणातील नेत्या सोनाली फोगट यांच्या खुनाला वाचा फुटली असून त्यांच्यासोबत असलेला स्वीय सचिव सुधीर सांगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर सिंग सांगवान या दोघांनी मिळून पूर्वनियोजित कट रचून तिला मारल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हिडिओ फुटेजसह अनेक पुरावे सापडले आहेत. मुख्य म्हणजे आपण दोघांनी मिळून सोनालीला रासायन मिश्रित अंमलीपदार्थ पाजून मारले, अशी कबुली दोघांनीही दिली असून त्यांना अटकही करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिष्णोई यांनी काल शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस महानिरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार संशयितांनी हणजूण येथील कर्लीज बारमध्ये रासायनिक विषारी पदार्थ पाण्यात मिसळून सोनालीला पाजल्याचा व्हिडिओ पुराव्यादाखल मिळाला आहे.
दरम्यान सोनाली फोगट यांच्या मृतदेहावर काल शुक्रवारी हिस्सार (हरियाणा) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगी यशोधारा हिने भडाग्नी दिला.
गोव्याच्या बदनामीमुळे व्यक्त होतेय नाराजी
सोनाली फोगट यांच्या या खुनाच्या प्रकरणामुळे गोव्यातील कोणीच सामील नसताना केवळ हा प्रकार गोव्यात घडला म्हणून देशभरात गोव्याची बदनामी होत आहे. अशा अनेक प्रकारांमध्ये गोव्याची बदनमी होत असल्याने पुन्हा एकदा गोव्यात नाराजी व्यक्त होत आहे. अनेकजण दुष्कृत्त्ये करण्यासाठी गोव्यात येतात आणि ती दुष्कृत्त्ये करुन जातात, मात्र विनाकारण गोव्याची बदनामी होत असते. तसेच गोव्याच्या पर्यटनावरही त्याचा विपरीत परिणाम होत असतो.
खुनाच्या तक्रारीनुसारच केला तपास
बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात केलेल्या सोनाली यांच्या शवचिकित्सेचा अहवाल मिळण्यापूर्वीच सोनालीचा भाऊ रिंकू ढाका यांच्या तक्रारीनुसार खुनाची तक्रार दाखल करून घेतली होती. त्यानुसार पोलीस चौकशीला सुरुवातही झाली होती. कोणतेही संशयित सुरुवातीला खरी माहिती देत नाहीत, त्यामुळे आम्ही खुनाची तक्रार नोंदविण्यास थोडा विलंब केला. मात्र वैद्यकीय अहवालाच्या आधारे तपासाला अधिक गती दिल्यानंतर संशय वाढल्याने संशयितांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली.
मात्र खुनाचा हेतु अद्याप अस्पष्ट
सोनाली यांच्या खुनाचा हेतू अद्याप स्पष्ट झाला नसला तरी मालमत्ता आणि राजकीय कारण असू शकते, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यानुसार आम्ही सर्वत्र चौकशी सुरू केली आहे. संशयितांना चोवीस तासांत न्यायालयासमोर हजर करून पोलीस कोठडी मिळवून पुढील चौकशी केली जाईल, असेही पोलीस महानिरीक्षकांनी सांगितले.
कर्लीज क्लबमध्येच झाला विषप्रयोग
पूर्वनियोजित कटानुसार हणजूण येथील कर्लीस क्लबमध्ये सोनालीला नेण्यात आले. तेथे रासायनिक अमलीपदार्थ द्रव्य मिश्रित करून त्यांना पाजल्याचे तेथील सीसीटीव्ही पॅमेरामध्ये दिसत आहे. पोलिसांना हा पुरावा सापडल्यानंतरच त्या दोघांनीही आम्ही सोनाली यांना विष घालून मारल्याची जबानी दिली. नेमके कोणते रासायनिक द्रव्य पाजण्यात आले याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.
स्कार्लेटचे प्रकरणही कर्लीजशीसंबंधितच
पंधरा वर्षापूर्वी गोव्यात आलेल्या स्कार्लेट किलिंग हिचा मृत्यू संशयास्परित्या झाला होता. ते प्रकरणही जगभर बरेच गाजले होते आणि त्याद्वारे गोव्याची बदनामी झाली होती. विशेष म्हणजे स्कार्लेटचा मृत्यू झाला तेव्हा कर्लीजमध्येच तिने जेवण, अमलीपदार्थ सेवन केले होते. तिच्यासह अन्य दोन व्यक्ती तेथे जेवण घेतल्यानंतर बेशुद्ध झाल्या होत्या. आता सोनाली यासुद्धा तेथे जेवण घेतल्यानंतर बेशुद्ध झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
खुनामागे अनेक प्रश्नांवर प्रश्न होतायत उपस्थित
- सोनाली शुटिंगसाठी चंदीगढला जाणार होत्या, मात्र त्या गोव्यात का आल्या?
- सोनालीचा खून सुधीर व सुखविंदर सांगवान यांनी का केला?
- या खुनामागे अन्य कोण दडलेले आहेत काय?
- कुणाच्या सांगण्यावरून सोनाली यांना विष पाजण्यात आले?
- खूनापूर्वी सोनाली यांना मारझोड का करण्यात आली?
- तिच्या अंगावर आढळलेल्या जखमा कशामुळे झाल्या?
- विष पाजून स्वच्छतागृहात दोन तास डांबून का ठेवले?
सोनाली यांना तब्बल दोन तास डांबले टॉयलेटमध्ये
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार संशयितांनी सोनालीना सोमवार 22 ऑगस्ट रोजी पहाटे 4.30 वा. जबरदस्तीने अंमलीपदार्थाद्वारे विष पाजले. यामुळे अर्धबेशुद्ध झाल्यानंतर तिला दोन तास स्वच्छतागृहात डांबण्यात आले. विषबाधेमुळे अस्वस्थ झालेल्या सोनालीना अर्धमेल्या अवस्थेत स्वच्छतागृहातून बाहेर काढून सेंट अँथोनी रुग्णालयात दाखल केले, त्यावेळी डॉक्टरांनी मृत घोषित केले.
टॅक्सीचालक पोलिसांच्या ताब्यात, बाकींची चौकशी
सोनाली यांना कर्लीज बारपर्यंत आणि बारमधून हॉटेलपर्यंत आणणारे टॅक्सीचालक, इस्पितळात दाखल करणाऱया महिला, कर्लीज बारच्या मालकाची चौकशी सुरू आहे. सोनाली फोगट हिला पाण्यातून अमलीपदार्थ पाजण्यात आल्याचे समोर आले आहे. कर्लीज बारमध्ये आणखी दोन युवती सोनाली यांच्या सोबत होत्या, अशी माहिती तेथील एका कर्मचाऱयाने पोलिसांना दिली आहे. कर्लीज बारमधून सोनाली यांना पुन्हा हॉटेलमध्ये घेऊन जाणाऱया टॅक्सी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हडफडेत तरुणाचा संशयास्पद मृत्यू
मुणांगवाडा-बादें-आसगाव येथील एलन आंतोनियो डिसोझा (28) याचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह हडफडे-बागा येथील जेमसन रेस्टॉरंटच्या परिसरात हणजूण पोलिसांना गुरुवारी रात्री आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात पाठवून दिला आहे.
स्थानिकांनी एलनच्या आकस्मिक मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. एलन डिसोझा हा विदेशात कामाला होता. येत्या एक दोन दिवसात तो विदेशात परतणार होता. गुरुवारी रात्री आपल्या जवळच्या मित्रांसमवेत डिनर पार्टी आयोजित करण्यात आली होती त्यात तो सहभागी झाला होता.