वार्ताहर / रामदुर्ग
मलप्रभा नदीला आलेल्या पुराने तालुक्यातील सुन्नाळ येथील सरकारी प्रौढ शाळेचे फारच नुकसान झाल्याने 1.02 कोटी रुपयाच्या अनुदानातून सुसज्ज इमारत बांधण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे आमदार महादेवप्पा यादवाड यांनी सांगितले. ते सुन्नाळ येथे सरकारी प्रौढ शाळेच्या भूमिपूजनप्रसंगी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, याशिवाय सिद्धारुढ येथील शाळेस 12 लाख रु., संगमेश्वरनगर येथील शाळेला 22 लाख रु., कल्लूर येथील सरकारी शाळेला 18.60 लाख रुपयाच्या अनुदानातून शाळा खोल्या बांधण्यात येत आहेत. मलप्रभेच्या महापुराने तालुक्यातील 161 शाळा खोल्या दुरुस्ती व पुनर्निर्माणासाठी 19 कोटी रु. अनुदान मंजूर झाले आहे. तालुक्यातील 65 गावातील शाळा खोल्यांची सुधारणा करण्यात येत आहे, असे सांगितले.