चौथ्या टी-20 सामन्यातही भारत विजयी, शार्दुल ठरला ‘हिरो’, पांडेचे नाबाद अर्धशतक
वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
यजमान न्यूझीलंडला सुपरओव्हरच्या साडेसातीची मालिका खंडित करण्यात पुन्हा एकदा अपयश आले आणि येथे झालेल्या चौथ्या टी-20 सामन्यात भारताने न्यूझीलंडला सुपरओव्हरमध्ये हरवून पाच सामन्यांच्या मालिकेत 4-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली. भारताच्या शार्दुल ठाकुरला सामनावीराचा बहुमान मिळाला. मुन्रो व सेफर्ट यांची शानदार अर्धशतके मात्र वाया गेली.
निर्धारित षटकांतील शेवटच्या दोन षटकांत न्यूझीलंडला केवळ 11 धावांची गरज होती आणि त्यांच्याकडे सात गडी बाकी होते. पण मानसिक समतोल राखण्यात पुन्हा एकदा ते अपयशी ठरले आणि हा सामना पुन्हा एकदा सुपरओव्हरपर्यंत लांबला. शेवटच्या षटकात 7 धावांची गरज असताना या षटकात त्यांनी 4 गडी गमवित 6 जमवून सामना टाय केला होता. हॅमिल्टनमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या तिसऱया सामन्यातही न्यूझीलंडला सुपरओव्हरमध्ये पराभूत व्हावे लागले आहे. सुपरओव्हरमध्ये न्यूझीलंडने 1 बाद 13 धावा केल्यावर भारताने 5 चेंडूत 16 धावा जमवित सहजपणे विजय साकार केला. केएल राहुलने पहिल्या दोन चेंडूत षटकार व चौकार ठोकत 10 धावा फटकावल्या. तिसऱया चेंडूवर तो बाद झाल्यानंतर कोहली व संजू सॅमसन यांनी सामना संपविला. कोहलीने पुढच्या चेंडूवर 2 व पाचव्या चेंडूवर चौकार मारून सामना संपविला.
या सामन्यात न्यूझीलंडने सलग चौथ्यांदा नाणेफेक जिंकली. खांद्याच्या दुखापतीमुळे नियमित कर्णधार केन विल्यम्सन या सामन्यात खेळला नव्हता. त्याच्या जागी टिम साऊदीने नेतृत्व केले. भारताला प्रथम फलंदाजी मिळाल्यावर मनीष पांडेचे नाबाद अर्धशतक आणि सलामीवीर केएल राहुलच्या उपयुक्त 39 धावांच्या बळावर भारताने 20 षटकांत 8 बाद 165 धावा जमविल्या. पांडेने 35 चेंडूत नाबाद 50 धावा फटकावल्या तर राहुल 26 चेंडूत 39 धावा काढल्या. 12 व्या षटकात भारताची स्थिती 6 बाद 88 अशी नाजुक झाली होती. पण पांडे व शार्दुल ठाकुर (15 चेंडूत 20) यांच्या फटकेबाजीमुळे भारताला दीडशेच्या पुढे मजल मारता आली. या जोडीने सातव्या गडय़ासाठी 43 धावांची भागीदारी केली. सोधीने प्रभावी मारा करीत भारताचे 26 धावात 3 गडी बाद केले.
खेळपट्टी व वातावरण फलंदाजीस अनुकूल असल्याने न्यूझीलंड हे आव्हान सहज पार करेल असे वाटले होते. त्यांच्या फलंदाजांनी हाराकिरी करून स्वतःहून पराभव ओढवून घेतला, असे म्हणावे लागेल. भक्कम स्थितीत असूनही दबावामुळे ते कोलमडले आणि सलग दुसऱया सामन्यात त्यांना सुपरओव्हरमध्ये पराभव स्वीकारावा लागला. कॉलिन मुन्रो व (47 चेंडूत 64) व टिम सेफर्ट (39 चेंडूत 57) यांच्या शानदार अर्धशतकी खेळी मात्र वाया गेल्या. तिसऱया सामन्यात मोहम्मद शमीने 20 व्या षटकात अचूक मारा केला होता. यावेळी शार्दुल ठाकुरने त्याची भूमिका पार पडली. न्यूझीलंडला 7 धावा हव्या असताना त्याने केवळ 6 धावा देत दोन बळीही मिळवित सामना टाय केला.
भारताने ही मालिका याआधीच जिंकली असल्याने या सामन्यान राखीव खेळाडूंना संधी दिली. संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी यांना मालिकेत पहिल्यांदाच अंतिम संघात स्थान मिळाले तर रोहित शर्मा, जडेजा, शमी यांना विश्रांती देण्यात आली. मात्र यापैकी एकालाही संधीचा लाभ घेता आला नाही.
166 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने मार्टिन गप्टिलला लवकर गमविले. पण मुन्रो व सेफर्ट यांनी 72 धावांची भागीदारी करून आव्हान जिवंत ठेवले. मुन्रोने 38 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, त्यात 6 चौकार, 3 षटकारांचा समावेश होता. कोहलीच्या थेट फेकीवर तो धावचीत झाला. हा त्यांच्यासाठी कलाटणी देणारा क्षण ठरला. यानंतर त्यांचे खेळाडू ठरावीक अंतराने बाद होत गेले. चहलने टॉम ब्रुसला शून्यावर बाद केले. पण सेफर्टला रॉस टेलरकडून थोडीफार साथ मिळाल्याने न्यूझीलंडने 18 व्या षटकात दीडशतकी मजल मारली. पण शेवटच्या षटकात त्यांचे फलंदाज दबावाखाली गडबडल्याचे दिसून आले. शार्दुलच्या या षटकातील पहिल्या चेंडूवर टेलर (18 चेंडूत 24) झेलबाद झाला. तिसऱया चेंडूवर सेफर्टला राहुलने धावचीत केले तर पाचव्या चेंडूवर डॅरील मिचेलला शार्दुलने झेलबाद केले आणि शेवटच्या चेंडूवर सॅमसन-राहुल यांनी दुसरी धाव घेणाऱया सँटनरला धावचीत केल्याने सामना टाय झाला. या मालिकेतील पाचवा व शेवटचा सामना रविवारी माऊंट माँगनुई येथे होणार आहे.
संक्षिप्त धावफलक : भारत 20 षटकांत 8 बाद 165 : राहुल 39 (26 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), सॅमसन 8, कोहली 11 (9 चेंडूत 2 चौकार), अय्यर 1, शिवम दुबे 12 (9 चेंडूत 2 चौकार), मनीष पांडे नाबाद 50 (36 चेंडूत 3 चौकार), वॉशिंग्टन सुंदर 0, शार्दुल ठाकुर 20 (15 चेंडूत 2 चौकार), चहल 1, सैनी नाबाद 11 (9 चेंडूत 2 चौकार), अवांतर 12. गोलंदाजी : साऊदी 1-28, कुगेलेइन 1-39, सँटनर 1-26, बेनेट 2-41, ईश सोधी 3-26.
न्यूझीलंड 20 षटकांत 8 बाद 165 : गप्टिल 4, मुन्रो 64 (47 चेंडूत 6 चौकार, 3 षटकार), सेफर्ट 57 (39 चेंडूत 6 चौकार, 3 षटकार), बुस 0, टेलर 24 (18 चेंडूत 2 चौकार), मिचेल 4, सँटनर 2, कुगेलेइन नाबाद 0, अवांतर 10. गोलंदाजी : शार्दुल 2-33, बुमराह 1-20, चहल 1-38.