फिरोजशाह कोटला मैदानावर हंगामातील पहिला आयपीएल साखळी सामना
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
यंदा उत्तम वाटचाल करत असलेल्या व एकजिनसी झालेल्या चेन्नई सुपरकिंग्सची आज (बुधवार दि. 28) आयपीएल साखळी सामन्यात झगडणाऱया सनरायजर्स हैदराबादविरुद्ध लढत होणार आहे. चेन्नई सुपरकिंग्सचा संघ सलग 4 विजयांमुळे उत्तम बहरात असल्याचे स्पष्ट झाले असून आता फिरोजशाह कोटला मैदानावर देखील सुदैवाची साथ लाभण्याची त्यांना अपेक्षा असेल. उभय संघातील ही लढत सायंकाळी 7.30 वाजता सुरु होईल.
तीनवेळचे विजेते असलेल्या चेन्नई सुपरकिंग्सला 2020 चा हंगाम अतिशय खराब स्वरुपाचा राहिला. त्यांचे आव्हान प्ले-ऑफपूर्वीच संपुष्टात आले. मात्र, यंदा त्यांनी सारी मरगळ झटकत ताज्या दमाने खेळ साकारण्यास सुरुवात केली आहे. अष्टपैलू रविंद्र जडेजाने चेन्नईच्या या वाटचालीत अगदी सिंहाचा वाटा उचलला आहे. रविवारी आरसीबीविरुद्ध खेळवल्या गेलेल्या साखळी सामन्यात त्याने हर्षल पटेलची शेवटच्या षटकात केलेली धुलाई निव्वळ लाजवाब स्वरुपाची राहिली.
सलामीवीर फॅफ डय़ू प्लेसिस व ऋतुराज गायकवाड यांना उत्तम सूर सापडला असून सुरेश रैना, अम्बाती रायुडू यांच्याकडून अद्याप मोठय़ा खेळीची अपेक्षा बाकी आहे. चेन्नईसमोर रशीद खानचा धोका जरुर आहे. मात्र, अन्य गोलंदाजांमध्ये मात्र तितकी सफाई नाही, ही सनरायजर्सची खरी डोकेदुखी आहे.
दुसरीकडे, हैदराबादचा संघ विदेशी खेळाडूंवर अधिक अवलंबून असून आघाडीच्या फलंदाजीवर असलेली सारी भिस्त, हे त्यांच्या चिंतेचे आणखी एक कारण ठरत आले आहे. सध्या हा संघ तळाच्या स्थानी फेकला गेला असून या परिस्थितीत बदल अपेक्षित असेल तर त्यांना सर्वप्रथम सांघिक समतोल साधण्यावर अधिक मेहनत घ्यावी लागेल. वॉर्नरला खराब फॉर्ममधून मार्ग काढता आला तरच हैदराबादला सरस कामगिरीची अपेक्षा करता येईल. चेन्नईचा जलद गोलंदाज दीपक चहर उत्तम बहरात असल्याने विशेषतः तो वॉर्नरला अडचणीत आणू शकण्याची क्षमता राखून असेल.
हैदराबादला वॉर्नरबरोबरच बेअरस्टो व विल्यम्सन यांना सूर सापडणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. मध्यफळीने अपेक्षित योगदान दिले तरच त्यांना चेन्नईविरुद्ध तोडीस तोड लढत देण्याची अपेक्षा करता येईल. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीत सातत्याचा अभाव असल्याने हैदराबादची गोलंदाजी कमकुवत असून त्यातच यॉर्कर स्पेशालिस्ट टी. नटराजन दुखापतीमुळे बाहेर असल्याने याची त्यांना मोठी किंमत मोजावी लागत आहे. चेन्नईविरुद्ध आज विजय संपादन करायचा असेल तर हैदराबादला प्रामुख्याने चमत्काराची अपेक्षा करावी लागेल आणि तो चमत्कार घडणार का, हे आज प्रत्यक्ष लढतीत स्पष्ट होईल.
प्रतिस्पर्धी संघ
चेन्नई सुपरकिंग्स ः महेंद्रसिंग धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सुरेश रैना, अम्बाती रायुडू, केएम असिफ, दीपक चहर, डेव्हॉन ब्रेव्हो, फॅफ डय़ू प्लेसिस, इम्रान ताहीर, एन. जगदीशन, कर्ण शर्मा, लुंगी एन्गिडी, मिशेल सॅन्टनर, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकुर, सॅम करण, आर. साई किशोर, मोईन अली, के. गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा, सी. हरी निशांत.
सनरायजर्स हैदराबाद ः डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), केन विल्यम्सन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), प्रियम गर्ग, विजय शंकर, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, विराट सिंग, जेसॉन होल्डर, मोहम्मद नबी, रशीद खान, शाहबाज नदीम, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, खलील अहमद, सिद्धार्थ कौल, बसिल थम्पी, जगदीश सुचित, केदार जाधव, मुजीब-उर-रहमान.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.