महिलांची टी-20 चॅलेंज स्पर्धा : आव्हान कायम राखण्यासाठी सुपरनोव्हाजला विजयाची गरज
शारजाह / वृत्तसंस्था
विद्यमान विजेत्या सुपरओव्हाज संघाला महिलांच्या टी-20 चॅलेंज स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी प्रतिस्पर्धी ट्रेलब्लेझर्स संघाला कोणत्याही परिस्थितीत नमवावेच लागेल. गुरुवारी व्हेलॉसिटी संघाला पराभवाचा धक्का दिल्यानंतर स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील ट्रेलब्लेझर्स संघाचे मनोबल उंचावले आहे. आता सलग दुसऱया विजयासह अंतिम फेरीत धडक मारण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. या स्पर्धेतील अंतिम लढत दि. 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
सुपरनोव्हाजला या स्पर्धेतील सलामी लढतीत व्हेलॉसिटीविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. आता आणखी एकदा पराभव झाल्यास त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
ट्रेलब्लेझर्सने यापूर्वी व्हेलॉसिटी संघाचा अवघ्या 47 धावांमध्ये धुव्वा उडवला, त्यावेळी इंग्लंडची डावखुरी फिरकीपटू सोफी एक्लेस्टोनने 3.1 षटकात 9 धावात 4 बळी, असा धमाकेदार मारा साकारला होता. सोफी विद्यमान टी-20 मानांकन यादीत अव्वलस्थानीही विराजमान आहे.
आजच्या लढतीत आपले गोलंदाज बलाढय़ सुपरनोव्हाज संघाविरुद्ध उत्तम कामगिरीची मालिका कायम राखतील, अशी मानधनाची अपेक्षा आहे. सुपरनोव्हाजचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे आहे. सुपरनोव्हाजला सध्या विजयाची नितांत गरज असून पुढे गुणतालिकेत एखाद्या संघाशी समान गुण असतील तर सरस धावगतीचा निकष अंमलात येईल. अशा परिस्थितीत व्हेलॉसिटीला उणे सरासरीचा (-1.869) फटका बसू शकतो.
दुसरीकडे, ट्रेलब्लेझर्सला सुपरनोव्हाजविरुद्ध विजय अपेक्षित आहे. भारतीय टी-20 कर्णधार कौर मागील फॉर्म कायम राखण्याच्या प्रयत्नात असेल. शिवाय, लंकन गोलंदाज चमारी अटापट्टू पुन्हा भेदक मारा करेल, अशी तिची अपेक्षाही असेल. यापूर्वी सुपरनोव्हाजचे मागील लढतीत उत्तम वर्चस्व राहिले. पण, त्यानंतर सुषमा वर्मा व सून लूस यांनी धुवांधार खेळी साकारत विजय हस्तगत केला होता.
शारजाहच्या खेळपट्टीवर सामना पुढे सरकत राहील, त्याप्रमाणे संथ गोलंदाजांचे पुन्हा एकदा वर्चस्व राहील, असे संकेत आहेत. ट्रेलब्लेझर्ससाठी एक्लेस्टोन महत्त्वाची गोलंदाज असेल तर डावखुरी राजेश्वरी गायकवाड व अनुभवी झुलन गोस्वामी यांची तिला पूरक साथ लाभू शकेल. सुपरनोव्हाज व ट्रेलब्लेझर्स यांच्याकडे अव्वल दर्जाचे फिरकी गोलंदाज आहेत. त्यामुळे, येथे रंगतदार लढतीची अपेक्षा आहे.
संभाव्य संघ
सुपरनोव्हाज : हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्यूज (उपकर्णधार), चमारी अटापट्टू, प्रिया पुनिया, अनुजा पाटील, राधा यादव, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), शशिकला सिरिवर्दने, पूनम यादव, शकेरा सेलमन, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्रकार, आयुषी सोनी, अयाबोन्गा खाका, मुस्कान मलिक.
ट्रेलब्लेझर्स : स्मृती मानधना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), पूनम राऊत, रिचा घोष, डी. हेमलता, नुझहत परवीन (यष्टीरक्षक), राजेश्वरी गायकवाड, हरलीन देओल, झुलन गोस्वामी, सिमरन दिल बहादूर, सलमा खातून, सोफी एक्लेस्टोन, नाथकन चान्थम, दियांदा डॉटिन, कश्वी गौतम.