नवे औषध अँटिबायोटिक्सना निष्प्रभ ठरणारे बॅक्टीरिया संपविणार
नव्या अँटीबायोटिक औषधाच्या संशोधनामुळे दरवर्षी सुपरबग्समुळे जीव गमावणाऱया सुमारे 70 लाख लोकांचा जीव वाचविता येणार आहे. अँटीबायोटिकचा अधिक किंवा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याने ज्यांच्यावर प्रभाव पडत नाही, अशा बॅक्टीरियांना सुपरबग्स म्हटले जाते.
अशाप्रकारचे बॅक्टीरिया प्रतिरोधक क्षमता तयार करवून घेत असतात. ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी आता एका संशोधनात सुपरबग्सना मारणाऱया अँटीबायोटिकचा शोध लावला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूलच्या संशोधनात या औषधाने उंदरांमध्ये कुठल्याही स्वस्थ पेशींना नुकसान न पोहोचविता सुपरबग्सना संपविल्याचे दिसून आले आहे.
अनेक दशकांमध्ये शोधण्यात आलेले हे अँटीबायोटिक टिक्सोबेक्टिनचे सिंथेटिक स्वरुप आहे. कोरोना महामारीदरम्यान लोकांच्या शरीरावर अनेक प्रकारच्या अँटीबायोटिक्सचा मारा करण्यात आला, ज्यांचा विषाणूवर कुठलाच प्रभाव पडला नाही. या स्थितीमुळे सुपरबग्सपोटी जीव गमावणाऱया लोकांची संख्या वाढली आहे. इंग्लंड सरकारच्या एका आयोगानुसार 2050 पर्यंत सुपरबग्समुळे दरवर्षी 1 कोटी लोकांचा जीव सुपरबग्समुळे जाण्याची शक्यता आहे.
अनेक बॅक्टिरिया नष्ट करण्यास यशस्वी
टिक्सोबेक्टिन उंदरांमध्ये एमआरएसए नावाच्या सुपरबगला संपविण्यास यशस्वी ठरले. एमआरएसएवर आतापर्यंत अनेक अँटीबायोटिक्स निष्प्रभ ठरली होती. तसेच टिक्सोबेक्टिन माणसांमध्ये आढळून येणाऱया अनेक बॅक्टिरियांना समाप्त करण्यासही यशस्वी ठरले आहे. सुपरबग्सविरोधात अखेरचा उपाय म्हणून आता या औषधाचा वापर केला जाणार आहे. टिक्सोबेक्टिनला सामान्य खोलीच्या तापमानात ठेवले जाऊ शकते. यामुळे ते सहजपणे जगभरात पाठविता येणार आहे.
खर्च खूपच कमी
2015 मध्ये अमेरिकेच्या मेन प्रांतात या औषधासंबंधी समजले होते. तेव्हा सर्वसामान्य लोकांना यासंबंधी सांगण्यात आले नव्हते, कारण याचे उत्पादन अत्यंत महाग होते. आता वैज्ञानिकांनी 2000 पट कमी खर्चात याचे सिंथेटिक स्वरुप तयार करण्यास यश मिळविले आहेत. मोठय़ा प्रमाणात टिक्सोबेक्टिन आता तयार करता येणार आहे.