ऑनलाईन टीम / तामिळनाडू :
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी आज एक मोठा निर्णय घेतला आहे. रजनीकांत लवकरच आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करत नव्या पक्षाची घोषणा करतील याकडे सर्वांचे लक्षा लागले असतानाच, रजनीकांत यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजकीय पक्ष सुरु करण्याचा विचार मागे घेतला आहे. रजनीकांत यांनी तीन पानांचे पत्र ट्विट करत ही घोषणा केली आहे. तसेच पक्ष स्थापन करत नसल्याबद्दल त्यांनी माफीदेखील मागितली आहे.
दरम्यान, रजनीकांत यांना नुकतेच प्रकृती बिघडल्याने हैद्राबादमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना रक्तदाब आणि थकव्याचा त्रास जाणवत होता. 27 डिसेंबरला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. डॉक्टरांनी त्यांना एक आठवडा विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
त्यानंतर आजच रजनीकांत यांनी, येत्या काळात आपण आपल्या तब्येतीवरच लक्ष देणार असल्याचे सांगत त्यांनी आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुकांमध्ये आपण तूर्तास दिसणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
आपल्या या निर्णयामुळे चाहते आणि समर्थकांची निराशा झालीच असेल, त्याबाबत या महान अभिनेत्याने दिलगिरीही व्यक्त केली आहे.