हैदराबाद : दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा ‘देव’ समजले जाणारे सुपरस्टार रजनीकांत यांना शुक्रवारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे इस्पितळात दाखल करण्यात आले. उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने त्यांना शुक्रवारी सकाळी हैदराबादमधील अपोलो रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांना उच्च रक्तदाबाशिवाय इतर कोणताही त्रास नसल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत रजनीकांत यांचा मोठा चाहता वर्ग असून, रजनीकांत लवकर बरे व्हावेत म्हणून चाहत्यांनी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे.
अभिनेते रजनीकांत हे कोरोनाबाधितांच्या संपर्कात आले होते. अभिनेत्री नयनतारा आणि रजनीकांत चित्रिकरणाच्या निमित्ताने हैदराबादमध्ये होते. चित्रिकरणाला सुरुवात झाल्यानंतर त्यांच्यासोबतच्या काही कलाकार-कर्मचाऱयांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे चित्रिकरण थांबविण्यात आले आहे. रजनीकांत यांनी 22 डिसेंबर रोजी कोव्हिड-19 संदर्भात चाचणी करून घेतली होती.