प्रतिनिधी / बेळगाव
दीपक नार्वेकर पुरस्कृत 16 वर्षाखालील बीपीसी लीग क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून सुपर एक्स्प्रेस अर्जुन स्पोर्ट्सने अलोन स्पोर्ट्स बेळगावचा 47 धावानी तर एक्सेस इलाईट हुबळीने सहारा स्पोर्ट्स बेळगावचा 8 गडय़ांनी पराभव केला. अष्टपैलू सिद्धेश असलकर (सुपरएक्स्प्रेस), ऋषिकेश राजपूत (एक्सेस) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या शुक्रवारच्या पहिल्या सामन्यात सुपर एक्स्पेस अर्जुन स्पोर्ट्सने 25 षटकात 9 बाद 140 धावा केल्या. त्यात कुशल कित्तूरने 39, सिद्धेश असलकरने 25, ध्रुव देसाईने 16 तर प्रथम मास्तमर्डीने 15 धावा केल्या. अलोन स्पोर्ट्सतर्फे सिद्धार्थ हुल्लोळीने 34 धावात 4, यश हावळाण्णाचेने 19 धावात 2 तर ओमकार देशपांडे व महंमद सामी शेख यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. त्यानंतर अलोन स्पोर्ट्स संघाचा डाव 22.3 षटकात 93 धावांत आटोपला. त्यात रोशन बेकवाडकरने 24, यश हावळाण्णाचेने 17, रजान मुल्लाने 15 तर ऋषिकेश पाटीलने 12 धावा केल्या. सुपर एक्स्प्रेसतर्फे करन बोकडेने 12 धावात 2, हर्ष पाटीलने 22 धावात 2, ध्रुव देसाई, सिद्धेश असलकर, आकाश असलकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या सामन्यात 3 फलंदाज धावचित झाले.
दुसऱया सामन्यात सहारा स्पोर्ट्स बेळगाव संघाने 25 षटकात 8 बाद 154 धावा केल्या. त्यात माधव धारवाडकरने 33, रोशन तालेबालकर 1 षटकार, 5 चौकारासह 37, साई कारेकरने 34 तर मनोज सुतारने 11 धावा केल्या.
एक्सेस इलाईटतर्फे सिद्धांत कदमने 22 धावात 2 तर तेजस मुर्डेश्वर व ऋषभ पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. त्यानंतर एक्सेस इलाईटने 20 षटकांत 2 बाद 158 धावा करून 8 गडय़ांनी विजय मिळविला. कर्णधार ऋषिकेश राजपूत व ऋषभ पाटील या जोडीने तिसऱया गडय़ासाठी 122 धावांची अभेद्य भागिदारी केली. ऋषिकेश राजपूतने 10 चौकारासह 49 चेंडूत नाबाद 69, ऋषभ पाटीलने नाबाद 50 धावा जमवित अर्धशतके झळकवली. त्यांना प्रभू सालशेट्टीने 15 धावा करून साथ दिली. सहारातर्फे शिवम पाटील व झुबेर सावनूर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे स्पर्धा सचिव परशराम पाटील, जिमखाना व्यवस्थापक महांतेश देसाई, ग्राऊंड्समन अनिल गवी, ज्योती पाटील यांच्या हस्ते सिद्धेश असलकरला तर वसंत मुर्डेश्वर, सुधीर चिकोडी, समाजसेवक नागेश देसाई यांच्या हस्ते ऋषिकेश राजपूतला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.