वृत्तसंस्था/ कोलकाता
सईद मुश्ताक अली करंडक टी-20 लीग स्पर्धेत सोमवारी इलाईट ब गटातील झालेल्या चुरशीच्या सामन्यात झारखंडने सुपर ओव्हरमध्ये हैद्राबादचा पराभव केला. त्याचप्रमाणे ओडिशाने आसामचा 4 गडय़ांनी पराभव केला.
सोमवारी इलाईट ब गटातील सामन्यात झारखंडने नाणेफेक जिंकून हैद्राबादला प्रथम फलंदाजी दिली. हैद्राबादने 20 षटकांत 9 बाद 139 धावा जमविल्या. त्यानंतर झारखंडने 20 षटकांत 9 बाद 139 धावा जमविल्याने या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लावण्यात आला. सुपर ओव्हरमध्ये पहिल्यादा फलंदाजी करताना झारखंडने बिनबाद 23 धावा जमविल्या. त्यानंतर झारखंडने 1 बाद 14 धावा केल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला. या सामन्यात झारखंडला 4 गुण मिळाले.
या सामन्यात हैद्राबादच्या डावात संदीपने 34 चेंडूत 4 चौकारांसह 37 धावा जमविल्या. अगरवालने 26, राहुल बुधीने 26 धावा केल्या. झारखंडतर्फे विवेकानंद तिवारी आणि विकास सिंग यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. त्यानंतर झारखंडच्या डावात उत्कर्ष सिंगने 29 अंकूल रॉयने 28, इशान किशनने 27 धावा केल्या. हैद्राबादच्या अजय देवगौडने 22 धावांत 4 गडी बाद केले. सुपर ओव्हरमध्ये झारखंडच्या किसनने रेड्डीच्या गोलंदाजीवर 2 षटकार तर रॉयने चौकार ठोकला. हैद्राबादने सुपर ओव्हरमध्ये एक गडी गमवित 14 धावा जमविल्या. सदर स्पर्धेच्या गुणतक्त्यात इलाईट ब गटात झारखंड 12 गुणांसह तिसऱया स्थानावर असून त्यांचे प्राथमिक गटातील सर्व सामने संपल्याने हैद्राबाद 4 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. या गटातील दुसऱया एका सामन्यात ओडिशाने आसामचा 4 गडय़ांनी पराभव केला. या गटात ओडिशा गुणतक्त्यात शेवटच्या स्थानावर आहे. ब गटात तामिळनाडूने आपले चारही सामने जिंकले असून ते आघाडीवर आहेत. यजमान बंगाल दुसऱया स्थानावर आहे.
संक्षिप्त धावफलक
हैद्राबाद 20 षटकांत 9 बाद 139, झारखंड 20 षटकांत 9 बाद 139, सुपर ओव्हर- झारखंड बिनबाद 23, हैद्राबाद 1 बाद 14.
आसाम 20 षटकांत 5 बाद 148, ओडिशा 19 षटकांत 6 बाद 154.