प्रतिनिधी / कोल्हापूर
एसईबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. वैद्यकीय प्रवेश प्रक्रीयेतही याचा फटका बसणार आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी वैद्यकीय शाखा प्रथम वर्ष प्रवेशासाठी सुपर न्यूमररी पद्धतीचा विचार करावा. उपलब्ध जागांच्या व्यतिरिक्त एसईबीसी वर्गासाठी 12 टक्के जागा सुपर न्युमररी पद्धतीने वाढवून या प्रवार्गातून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश मिळावा, अशी मागणी सकल मराठा सामाजातील विद्यार्थी पालक यांनी केली आहे. मागणीचे निवेदन सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हाप्रशासनामार्फत देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या एसईबीसी आरक्षणाला स्थगिती देण्यात आली आहे. स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकार व सर्व मराठा संघटनांकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र यासाठी किती कालावधी लागेल हे निश्चित सांगता येणार नाही. नॅशनल मेडिकल कमिशनने वैद्यकीय शिक्षण वर्ग सुरु करण्याबाबत वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार 2020-21 शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष एमबीबीस आणि बीडीएस वर्ग फेब्रुवारी 2021 मध्ये सुरु होणार आहेत.
यापुर्वी वैद्यकीय प्रवेश प्रक्रीयेची पहिली फेरी प्रथम वर्ष वर्ग सुरु होण्यापुर्वी होत असे व उर्वरीत प्रक्रीया कॉलेज सुरु झाल्यानंतर पहिल्या महिन्यात होते. मात्र यंदा मराठा आरक्षण आणि औरंगाबाद खंडपीठ 70/30 कोटा प्रकरण प्रलंबित असताना राज्या सीईटी विभागाकडून वैद्यकीय प्रवेशाचे घाई का सुरु आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे सुपर न्युमररी पद्धतीचा विचार करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.
निवेदन देतेवेळी पालक अजय कोराणे, राजेश पवार, सुनील ढोणुक्षे, काकासाहेब कदम, प्रमोद भांदिगरे, डॉ. ज्योती पाटील, व्यंकटेश रानमाळे, बजरंग पाटील, विद्यार्थी युगंधर रानमाळे, प्रणव पाटील आदी उपस्थित होते.
वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची केवळ घोषणा
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी प्रवेश मिळालेल्या एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांची फी सरकार भरणार अशी घोषण करुन प्रवेश प्रक्रीया पुढे रेटली. मात्र त्यांनी याबबात केवळ घोषणा केली आहे. अध्यादेश अद्याप काढलेला नाही. सद्दपरिस्थितीत एसईबीसी वर्गातून प्रवेशच मिळणार नसल्याने फी सवलत काय कामाची, असा संतप्त सवाल पालकांमधून उपस्थित होत आहे.
निर्णय होईपर्यंत स्थगिती द्या
वैद्यकीय प्रवेश प्रक्रीयेत जागांची विभागणी करताना निर्माण केलेला प्रादेशिक कोटा 70/30 पद्धत रद्द करण्यात आली. यामुळेही विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. तरी हि पद्धत पुर्ववत करण्यात यावी. याबाबत निर्णय होईपर्यंत वैद्यकीय प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रीया स्थगित करण्यात यावी. निर्णय झाल्यानंतर नवीन नियमावलीप्रमाणे प्रवेश प्रक्रीया राबविण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.