टोकियो ऑलिम्पिक : सिंधूचा डेन्मार्कच्या ब्लिचफेल्टविरुद्ध एकतर्फी विजय, तिरंदाजीत अतानू दास, मुष्टियुद्धात सतीशची आगेकूच
वृत्तसंस्था /टोकियो
भारताची विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन पीव्ही सिंधूने बॅडमिंटन महिला एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली तर तिरंदाजीत अतानू दास व मुष्टियुद्धात सतीश कुमार यांनीही विजयी घोडदौड सुरु ठेवली. मुष्टियुद्धातील महिला फ्लायवेट 51 किलोग्रॅम वजनगटात स्टार बॉक्सर एमसी मेरी कोमचा झुंजार लढतीनंतरही झालेला पराभव मात्र चटका लावून जाणारा ठरला.
26 वर्षीय पीव्ही सिंधूने 13 व्या मानांकित ब्लिचफेल्टचा 21-15, 21-13 अशा फरकाने एकतर्फी पराभव करत आपली विजयी घोडदौड कायम राखली. आता बॅडमिंटनच्या या महिला एकेरीत तिचा पुढील मुकाबला जपानची अकाने यामागुची हिच्याविरुद्ध होईल.
‘पहिल्या गेममध्ये मी उत्तम सुरुवात केली. पण, 15-16 च्या दरम्यान बचावावर अधिक भर देण्याच्या प्रयत्नात काही गुण नाहक बहाल केले. माझे प्रशिक्षक मला चुकीच्या पद्धतीने खेळत असल्याचे सांगत होते. त्यानंतर मी तातडीने तंत्र बदलले आणि पहिला गेम पार केला. दुसऱया गेममध्ये मात्र माझा खेळ काटेकोर झाला. मी प्रारंभापासूनच आघाडी घेतली आणि ती कायम देखील राखली’, असे सिंधू या सामन्याबद्दल बोलताना म्हणाली.
सिंधूने आक्रमणावर भर देत असतानाच बचावाचाही उत्तम मिलाफ साधला. तिने स्मॅश व ड्रॉपचे काही उत्तम फटके लगावत आघाडी कायम राखली. 41 मिनिटांच्या या सामन्यात तिचे कोर्ट कव्हरेज देखील उत्तम राहिले. ब्लिचफेल्टने पिछाडीवर असताना देखील सिंधूवर दडपण राखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, काही स्वैर फटक्यांमुळे ती याचा लाभ घेऊ शकली नाही.
ब्लिचफेल्टने अनेकदा आघाडीवर येण्याचा प्रयत्न केला. मात्र, येथे देखील सिंधूने तिला फारसे यश मिळू दिले नाही. पुरुष एकेरीत बी. साई प्रणित पराभूत झाला असल्याने बॅडमिंटनमध्ये भारताच्या अपेक्षा आता फक्त पीव्ही सिंधूवरच अवलंबून आहेत.
सतीश कुमारची उपांत्यपूर्व फेरीत धडक
यंदा ऑलिम्पिक पदार्पण करत असलेला भारतीय मुष्टियोद्धा सतीश कुमारने 91 किलोवरील वजनगटात जमैकाच्या रिकार्डो ब्राऊनला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. हे दोन्ही प्रतिस्पर्धी आपल्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये खेळत होते. त्यात सतीशने 4-1 असा सहज विजय संपादन केला. सतीश कुमारने ब्राऊनच्या खराब फूटवर्कचा पुरेपूर लाभ घेतला. आता उपांत्यपूर्व फेरीत सतीशची लढत उझ्बेकच्या जालोलोव्हविरुद्ध होईल. जालोलोव्ह हा विद्यमान वर्ल्ड व आशियाई चॅम्पियन असून सतीश कुमार 2018 राष्ट्रकुलचा रौप्यजेता आहे. ब्राऊन हा 1996 नंतर जमैकातर्फे ऑलिम्पिकमध्ये पात्रता संपादन करणारा पहिलाच बॉक्सर होता. ब्राऊन हा सेन्सी ज्यूस या सेंद्रिय ज्यूस कंपनीचा सहसंस्थापक असून आश्चर्य म्हणजे 2014 पर्यंत त्याने स्वतः शेफ म्हणूनही काम केले आहे.
तिरंदाजीत अतानू दासचा ऑलिम्पिक चॅम्पियन हेएकला धक्का
भारतीय तिरंदाज अतानू दासने दोनवेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन कोरियाच्या ओह जिन हेएकसारख्या तगडय़ा प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा उडवत वैयक्तिक गटातील उपउपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले. मिश्र दुहेरीत अगदी शेवटच्या क्षणी खराब फॉर्ममुळे अतानू दासऐवजी प्रवीण जाधवला खेळवले गेले होते. येथे मात्र, वैयक्तिक गटात त्याला उत्तम सूर सापडला असल्याचे गुरुवारी निकालावरुन स्पष्ट झाले.
लंडन 2012 ऑलिम्पिक सुवर्णजेता व सांघिक सुवर्णजेता असलेल्या ओह जिन हेएकने पहिल्या काही शूटमध्ये 9 च्या आसपास गुण घेतले. अतानूने मात्र परफेक्ट 10 चा वेध घेत आघाडी मिळवली. अतानू दासप्रमाणे त्याची पत्नी दीपिका कुमारी देखील महिला गटात उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचली असून भारताला ऑलिम्पिक इतिहासातील पहिलेवहिले तिरंदाजी पदक जिंकून देण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. एकाच इव्हेंटमध्ये सहभागी होणारे भारताचे ते पहिले जोडपे देखील ठरले आहे.
दीपिकाने यापूर्वी रशियन जागतिक क्रमवारीतील आठव्या मानांकित पेरोव्हाला पराभवाचा धक्का दिला होता. तीच महत्त्वाकांक्षा अतानू दासने देखील दर्शवली आहे. दासचा मुकाबला आता जपानचा ताकाहारु फुरुकावा याच्याविरुद्ध शनिवारी होईल.
स्टार बॉक्सर एमसी मेरी कोमचे आव्हान संपुष्टात
सहा वेळची वर्ल्ड चॅम्पियन एमसी मेरी कोमचे ऑलिम्पिकमधील आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आल्याने भारताला गुरुवारी मोठा धक्का बसला. 2016 रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यजेती इनग्रिट व्हॅलेन्सियाने मेरी कोमला 3-2 फरकाने पराभवाचा जबरदस्त झटका दिला.
38 वर्षीय एमसी मेरी कोम ही आशियाई चॅम्पियन व 2012 लंडन ऑलिम्पिक कांस्यजेती आहे. यंदा तिने उत्तम सुरुवात केली असल्याने येथेही आशाअपेक्षा उंचावलेल्या असणे साहजिक होते. मात्र, व्हॅलेन्सियाविरुद्ध जबरदस्त झुंज दिल्यानंतरही शेवटची ठरु शकणाऱया या ऑलिम्पिक लढतीत मेरीचे इरादे उद्ध्वस्त झाले. मणिपूरच्या अनुभवी मेरी कोमने पराभूत झाल्यानंतरही स्मित हास्याने दोन्ही हात उंचावून उपस्थितांना अभिवादन केले आणि आपली खिलाडूवृत्ती दाखवून दिली. मेरीने यापूर्वी व्हॅलेन्सियाला 2019 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये उपांत्यपूर्व फेरीत नमवले होते. पण, येथे व्हॅलेन्सियाने बाजी मारली. एमसी मेरी कोमविरुद्ध व्हॅलेन्सियाचा हा कारकिर्दीतील पहिलाच विजय ठरला.
गोल्फमध्ये अनिरबन लाहिरीची उत्तम सुरुवात
आपली दुसरी ऑलिम्पिक खेळत असलेल्या भारतीय गोल्फपटू अनिरबन लाहिरीने पहिल्या फेरीत संयुक्त सहावे स्थान संपादन करत उत्तम सुरुवात केली. खराब हवामानाचा फटका बसलेल्या या इव्हेंटमध्ये माजी आशियाई अव्वलमानांकित लाहिरीने आपला फॉर्म दाखवून दिला. आणखी एक भारतीय गोल्फपटू उदयन मानेने देखील लक्षवेधी सुरुवात केली आहे. लाहिरीने यापूर्वी भाग घेतलेल्या बार्बासोल चॅम्पियनशिपमध्ये तिसरे स्थान मिळवले होते. येथेही सरस कामगिरी करण्याचा मानस त्याने व्यक्त केला.
मनू भाकरला 5 वे, राहीला 25 वे स्थान
भारतीय नेमबाज मनू भाकर व राही सरनोबत गुरुवारी महिलांच्या 25 मीटर्स पिस्तूल क्वालिफिकेशन (प्रीसिजन) फेरीअखेर अनुक्रमे 5 व्या व 25 व्या स्थानी राहिले. 44 नेमबाजांचा सहभाग असलेल्या या इव्हेंटमध्ये भाकरने प्रीसिजन राऊंडमध्ये 30 शॉट्समध्ये 292 गुणांची कमाई केली तर राष्ट्रीय सहकारी, कोल्हापूरची नेमबाज राही सरनोबत हिने 287 गुणांपर्यंत झेप घेतली.
क्वॉलिफिकेशनमधील दुसरी स्टेज अर्थात रॅपिड राऊंड आज होत असून यानंतर अव्वल 8 नेमबाज अंतिम फेरीत पात्र ठरणार आहेत. सर्बियाची झोरॅनो ऍरुनोव्हिक पहिल्या फेरीअखेर 296 गुणांसह आघाडीवर राहिली तर ग्रीसची ऍना 294 गुणांसह दुसऱया स्थानी राहिली.