मुंबई \ ऑनलाईन टीम
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एक मागणी केली आहे. स्वयंपाकाच्या गॅसचे सिलिंडर रु. ८०० च्या पार पोहोचले आहे.अनेकांना ही रक्कम परवडत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे. किमान कोरोना काळात तरी जनतेची आर्थिक स्थिती लक्षात घेता कृपया गॅसच्या किंमती सर्वसामान्यांना परवडतील अशा पद्धतीने कमी करण्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पंतप्रधान कार्यालयाला टॅग करून ट्वीट केलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सर्व व्यवहार जवळपास ठप्प झाले आहेत. अशा परिस्थितीत जनतेची क्रयशक्ती देखील घटली असून अनेक कुटुंबांचे बजेट कोलमडले आहे. या परिस्थितीतही स्वयंपाकाच्या गॅसचे सिलिंडरचे दर ८०० रुपयांच्या पार पोहोचले आहेत. अनेकांना ही रक्कम परवडत नसल्यामुळे त्यांचे हाल होत आहेत.
समाजातील बहुतांश घटक गॅसच्या वाढत्या किंमतीमुळे त्रस्त आहेत. आपणास नम्र विनंती आहे की, किमान कोरोना काळात तरी जनतेची आर्थिक स्थिती लक्षात घेता कृपया गॅसच्या किंमती सर्वसामान्यांना परवडतील अशा पद्धतीने कमी करण्याबाबत सकारात्मक विचार करावा.अवश्य यावर विचार करुन सर्वसामान्यांना दिलासा द्याल, हा विश्वास आहे. धन्यवाद, असं सुप्रिया सुळे या ट्वीटमध्ये म्हणाल्या आहेत.