नवी दिल्ली / वृत्तसंस्था
एकीकडे, रोहित शर्मा, सुर्यकुमार यादवसारखे आक्रमक फलंदाज तर दुसरीकडे, फॅफ डय़ू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड यांच्यासारखे तडफदार फलंदाज असतील तर अशा आयपीएल सामन्यासारखी दुसरी पर्वणी ती कोणती? चॅम्पियन्स मुंबई इंडियन्स व पॉवर चॅम्पियन्स चेन्नई सुपरकिंग्सचे संघ आज (शनिवार दि. 1) येथील अरुण जेटली स्टेडियमवर आमनेसामने भिडतील, त्यावेळी सुप्रीमसीवर शिक्कामोर्तब करणे, हे एकच त्यांच्यासमोरील लक्ष्य असणार आहे. सायंकाळी 7.30 वाजता या लढतीला सुरुवात होईल.
मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपरकिंग्स या दोन्ही संघांनी आपल्या मागील लढतीत 7 गडी राखून विजय संपादन केले आहेत. मुंबईने राजस्थानविरुद्ध तर चेन्नईने हैदराबादविरुद्ध यश संपादन केले. तीच घोडदौड या लढतीतही कायम ठेवण्याच्या इराद्याने ते मैदानात उतरतील.
सलामीवीर क्विन्टॉन डी कॉक फॉर्ममध्ये परतला, ही मुंबईसाठी सर्वात जमेची बाजू ठरली आहे. राजस्थानविरुद्ध 70 धावांची नाबाद खेळी साकारणाऱया डी कॉकच्या खात्यावर आता हंगामात 117 धावा नोंद आहेत. मुंबईची झगडणारी मध्यफळी देखील मागील लढतीत बहरात परतली. सुर्यकुमार यादव (170 धावा) आता उत्तम प्रारंभानंतर त्याचे मोठय़ा खेळीत रुपांतर करेल, अशी मुंबईला अपेक्षा असून कृणाल पंडय़ा (68) देखील थोडीफार फटकेबाजी करत आला आहे.
केरॉन पोलार्डने (81) गुरुवारी विस्फोटक फलंदाजीची थोडी प्रचिती दिली. फक्त फलंदाज या नात्याने संघात असलेल्या अष्टपैलू हार्दिक पंडय़ाचे (36) योगदान आतापर्यंत तरी किरकोळ स्वरुपाचे राहिले आहे. जलद गोलंदाज जसप्रित बुमराह व ट्रेंट बोल्ट लक्षवेधी योगदान देत आले असून विशेषतः शेवटच्या षटकातील त्यांचा मारा प्रशंसनीय ठरत आला आहे. आता चेन्नईच्या फलंदाजांना रोखून धरण्यात त्यांची भूमिकाच महत्त्वाची ठरणार आहे.
लेगस्पिनर राहुल चहरने मुंबईतर्फे सर्वाधिक 11 बळी घेतले असले तरी त्याला कृणाल व ऑफस्पिनर जयंत यादव यांच्याकडून आणखी साथ मिळणे क्रमप्राप्त आहे. मुंबईचा संघ येथे पुन्हा नॅथन काऊल्टर-नाईललाच संधी देणार की इशान किशन अंतिम एकादशमध्ये परतू शकणार, हे आज संघनिवडीत स्पष्ट होईल. इशान किशनला संघात स्थान दिले गेल्यास पोलार्डला काही षटके गोलंदाजी करावी लागेल, हे निश्चित असणार आहे.
प्रतिस्पर्धी संघ
मुंबई इंडियन्स ः रोहित शर्मा (कर्णधार), ऍडम मिल्ने, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, अनुकूल रॉय, अर्जुन तेंडुलकर, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, हार्दिक पंडय़ा, इशान किशन, जेम्स नीशम, जसप्रित बुमराह, जयंत यादव, केरॉन पोलार्ड, कृणाल पंडय़ा, मार्को जान्सन, मोहसिन खान, नॅथन काऊल्टर-नाईल, पीयूष चावला, क्विन्टॉन डी कॉक (यष्टीरक्षक), राहुल चहर, सौरभ तिवारी, सुर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, युद्धवीर सिंग.
चेन्नई सुपरकिंग्स ः महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अम्बाती रायुडू, केएम असिफ, दीपक चहर, डेव्हॉन ब्रेव्हो, फॅफ डय़ू प्लेसिस, इम्रान ताहीर, एन. जगदीशन, कर्ण शर्मा, लुंगी एन्गिडी, मिशेल सॅन्टनर, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकुर, सॅम करण, आर. साई किशोर, मोईन अली, के. गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा, सी. हरी निशांत.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.
सहाव्या विजयासाठी चेन्नई सुपरकिंग्स सज्ज
मागील मोसमातील सर्व मरगळ झटकून, नव्या दमाने मैदानात उतरत आलेल्या चेन्नई सुपरकिंग्सने यंदा 6 पैकी 5 सामने जिंकत जोरदार सुरुवात केली असून आज मुंबईविरुद्ध हंगामातील 6 वा विजय नोंदवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. सलामीवीर डय़ू प्लेसिस (270 धावा) व ऋतुराज (192 धावा) उत्तम फॉर्ममध्ये असून फ्लाईंग स्टार्ट करुन देण्याचा त्यांचा येथेही इरादा असेल.
चेन्नईची मध्यफळी उत्तम राहिली असून मोईन अलीने (148 धावा) पिंच हिटरची भूमिका चोखपणे पार पाडली आहे. सुरेश रैनामुळे (121) संघाची फलंदाजी आणखी भक्कम राहिली आहे. याशिवाय, अम्बाती रायुडू (64) व रविंद्र जडेजाही (109) आहेत. कर्णधार महेंद्रसिंग धोनी (37) मात्र अद्याप नॉन स्ट्रायकर एण्डवरच राहणे अधिक पसंत करत असल्याचे चित्र आहे.
दीपक चहर (8 बळी), सॅम करण (6 बळी) यांच्यामुळे चेन्नईची गोलंदाजी भक्कम असून शार्दुल ठाकुर (4 बळी) सेट झालेल्या फलंदाजांची एकाग्रता भंग करण्याची ताकद राखून असतो. जडेजाने गोलंदाजीत व क्षेत्ररक्षणात देखील उत्तम योगदान दिले असून जडेजासह मोईन अलीची उपयुक्त फिरकी गोलंदाजी चेन्नईचे बलस्थान ठरत आले आहे. या बळावर मुंबईला नमवण्याचे चेन्नईचे इरादे आहेत. ते किती सफल होतील, हे प्रत्यक्ष लढतीत स्पष्ट होणार आहे.