प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्यातील सुभाषनगर येथे महालक्ष्मी कलेक्शन आणि ज्वेलर्स हे दुकान फोडून चोरटय़ांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि साडय़ा असा 37 हजार, पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत सविता राजकुमार पाटील (वय 37, रा. सुभाषनगर, क गट) यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. दरम्यान, शहर आणि ग्रामीण भागात लागोपाट घरफोडय़ा होत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
सविता पाटील यांचे सुभाषनगरमध्ये पाण्याच्या टाकीजवळ महालक्ष्मी कलेक्शन आणि सराफ ज्वेलरी दुकान आहे. सोमवारी 25 रोजी रात्री 11 च्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. मध्य रात्रीच्या सुमारास चोरटय़ांनी सदर दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने, 20 साडय़ा आणि इंडरवेअरचे सात बॉक्स असा 37 हजार, पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.
मंगळवारी सकाळी पाटील यांच्या दुकानात चोरी झाल्याची बाब निदर्शनास आली. सविता पाटील यांनी दुकानात जावून पाहणी केली असता वरील ऐवज चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. ग्रामीण पोलिसात अज्ञात चोरटय़ा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहर आणि ग्रामीण भागात चोऱया आणि घरफोडय़ांचे सत्र सुरूच आहे. मागील आठवडय़ात सांगली-मिरजेतील एकूण नऊ घरफोडय़ा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असले तरीही दररोज चोऱया होत असल्याने चोरटय़ांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. पोलिसांनी या चोरटय़ांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.