राजभवनच्या नव्या दरबार हॉलमध्ये होणार कार्यक्रम : गोवा मुक्तीनंतर सांगेला प्रथमच मिळणार प्रतिनिधीत्व
प्रतिनिधी /पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळाचा आज शनिवार दि. 9 एप्रिल रोजी विस्तार करण्यात येणार असून तीन आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात येणार आहे. राजभवन येथे नव्याने साकारण्यात आलेल्या दरबार हॉलमध्ये हा शपथविधी दुपारी 12 वाजता होणार आहे. भाजपचे नीळकंठ हळर्णकर, सुभाष फळदेसाई यांच्यासह मगोचे सुदिन ढवळीकर यांचा शपथविधी होणार आहे.
गेल्या 28 मार्च रोजी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासह एकूण 9 जणांचा शपथविधी बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये मोठा गाजावाजा करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, शिवाय भाजपशासित 9 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी मंत्रिपदाची शपथ दिली होती.
राजभवनच्या दरबार हॉलमध्ये शपथविधी
आज शनिवारी हा शपथविधी सोहळा राजभवनच्या नव्या दरबार हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. गोव्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी लागला होता. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ साकार होण्यास 18 दिवस लागले. त्यानंतर त्यांना खाती देण्यास 8 दिवस गेले. आता दुसऱया टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार 10 ते 12 दिवसांनी होत आहे. अजून अनेक महत्त्वाची खाती वाटायची आहेत. ती मुख्यमंत्री आपल्याकडे ठेवतात की नव्या मंत्र्यांना देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. काही मंत्र्यांनी कार्यालयाचा ताबा घेतला असून कामे सुरू केली आहेत. काही मंत्र्यांनी अद्याप कामे सुरू केली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
सांगेला गोवा मुक्तीनंतर प्रथमच मंत्रिमंडळात संधी गोवा मुक्तीनंतर आजवर सांगे तालुक्याला कधीही संधी प्राप्त झाली नव्हती. सुभाष फळदेसाई यांच्या निमित्ताने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रथमच सांगे तालुक्याला मंत्रिमंडळ विस्तारात संधी दिली आहे. सुभाष फळदेसाई हे सांगेचे पहिले मंत्री असणार आहेत. तथापि यापूर्वी 1998 मध्ये सत्ताधारी काँग्रेसपक्षाशी सांगेचे तत्कालीन आमदार पांडू वासू नाईक यांनी बंडखोरी केल्यामुळेच त्यांना तत्कालीन बंडखोर मुख्यमंत्री डॉ. विल्फ्रड डिसोझा यांच्या मत्रिमंडळात स्थान मिळाले. तथापि हे सरकार केवळ साडेतीन महिनेच सत्तेवर राहिले. त्यामुळे सांगेला पूर्ण संधी कधी मिळाली नव्हती ती आता प्राप्त होईल.