सांगेच्या विकासासाठी भाजपाला संधी देण्याचे आवाहन
प्रतिनिधी /सांगे
सांगे मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष फळदेसाई यांनी गावागावात बैठका घेण्याचा सपाटा लावला असून अशीच एक बैठक दापोडा, भाटी येथे घेतली. यावेळी गावचे नागरिक मोठय़ा संख्येने हजर होते. सांगे मतदारसंघाचा विकास साधण्यासाठी आणि राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आणण्यासाठी भाजपला संधी द्या, असे आवाहन फळदेसाई यांनी केले.
यावेळी फळदेसाई यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. सध्या हा मतदारसंघ अपक्ष आमदाराकडे असून विकास ठप्प झाल्याचे दिसून येते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गोव्याच्या विकासासाठी ज्या तळमळीने कार्य करतात ते पाहिल्यास सावंत पुन्हा मुख्यमंत्री होणे गरजेचे आहे. दापोडा येथील जनता निश्चितच भाजपला साथ देईल, अशी आशा फळदेसाई यांनी व्यक्त केली.
जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर म्हणाले की, आजवर भाजप सरकारने जो विकास केला आहे त्याला तोड नाही. भाजपमुळेच मी जिल्हा पंचायत सदस्य झालो. या मतदारसंघात पुन्हा भाजपचे कमळ फुलविण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे. भाजपला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. लोकांची उपस्थिती पाहता ते भाजपबरोबर आहेत हे दिसून येते, असे केपेकर म्हणाले.
कोविड काळातही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी उत्तम प्रकारे परिस्थिती हाताळली. जनतेसाठी ते कार्य करत आहेत. त्यांनी अनेक योजना राबविल्या आहेत. अटल आसरासारखी योजना राबविण्याबरोबर वन हक्क निवासी दावे निकालात काढले गेले आहेत, असे केपेकर म्हणाले. यावेळी सांगे भाजपचे सरचिटणीस राजेश गावकर, चंद्रकांत गावकर, युवा मोर्चा सरचिटणीस सुहास देईकर, उपाध्यक्ष प्रकाश गावकर हजर होते. निवडणुकीला सुमारे दोन महिने बाकी असताना गावागावात बैठका घेण्यास इच्छुक उमेदवारांनी प्रारंभ केला आहे.