पुरुषांच्या फ्री स्टाईल इव्हेंटमधून पात्रता संपादन करणारा चौथा भारतीय मल्ल
सोफिया (बल्गेरिया) / वृत्तसंस्था
सुमित मलिक हा टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा भारताचा पुरुष गटातील चौथा फ्री स्टाईल पुरुष मल्ल ठरला आहे. येथे वर्ल्ड ऑलिम्पिक क्वॉलिफायर्स इव्हेंटमध्ये 125 किलोग्रॅम वजनगटात अंतिम फेरी गाठल्यानंतर त्याचे टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित झाले. सुमित मलिक याच्यापूर्वी रवी दाहिया (65 किलोग्रॅम), बजरंग पुनिया (65 किलोग्रॅम) व दीपक पुनिया (86 किलोग्रॅम वजनगट) यांनीही ऑलिम्पिकसाठी आपली पात्रता निश्चित केली आहे.
2018 राष्ट्रकुल सुवर्णजेत्या 28 वर्षीय सुमित मलिकसाठी ऑलिम्पिक सहभागाची ही पहिलीच वेळ असणार आहे. वर्ल्ड ऑलिम्पिक क्वॉलिफायर्सच्या अंतिम फेरीत पोहोचणारे मल्ल ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्यासाठी थेट पात्र ठरतात.
सुमित मलिकने येथे उपांत्य फेरीत पूर्वीपेक्षा आक्रमक खेळावर भर दिला आणि हीच रणनीती त्याला यश मिळवून देणारी ठरली. त्याने उपांत्य फेरीत व्हेनेझुएलाच्या जोस डॅनिएल दियाज रॉबर्टीचा 5-0 अशा एकतर्फी फरकाने फडशा पाडला.
दुसरीकडे, अमित धनकर (74 किलोग्रॅम) व सत्यवर्त कादियन (97 किलोग्रॅम) यांना मात्र या स्पर्धेच्या विविध स्तरावर अनुभव पणाला लावून देखील ऑलिम्पिक पात्रता निश्चित करता आली नाही.
सुमित मलिक 125 किलोग्रॅम वजनगटातील एका लढतीत किर्गिस्तानविरुद्ध ऐयल लॅझारेव्हविरुद्ध एकवेळ 1-2 अशा फरकाने पिछाडीवर होता आणि यावेळी अगदी शेवटच्या 25 सेकंदांचा मोजका वेळ बाकी होता. याचवेळी सुमितला पुशआऊटचा महत्त्वाचा गुण संपादन करता आला आणि यामुळे 2-2 अशी बरोबरी होऊन तांत्रिक निकषावर त्याला विजयी घोषित केले गेले.
अलेक्झांडर रोमानोव्हविरुद्ध विजय
त्यानंतर सुमितची पुढील लढत मॉल्डोव्हाच्या अलेक्झांडर रोमानोव्हविरुद्ध होती. येथेही सुमित 0-1 फरकाने पिछाडीवर होता आणि येथेही त्याने पिछाडी भरुन काढत आपली आगेकूच कायम राखली. या स्पर्धेत सुमित मलिक विशेषतः निर्णायक टप्प्यात आक्रमक खेळ साकारण्यावर अधिक भर देत आला असून ही चाल यशस्वी देखील ठरत आली आहे. त्याने येथे रोमानोव्हविरुद्ध शेवटच्या क्षणी 3-2 अशी निसटती बाजी मारली.
पुढे, उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत ताजिकिस्तानच्या रुस्तम इस्कंदरीविरुद्ध मलिक एकवेळ 2-4 अशा पिछाडीवर असल्याने दडपणाखाली होता. एकवेळ 2-0 अशी प्राप्त आघाडी त्याला गमवावी लागली आणि पुढे तो 2-4 असा पिछाडीवर फेकला गेला. पण, येथेही सुदैवाने अंतिम क्षणी त्याला खेळ उंचावता आला आणि तो पुन्हा बाजी मारण्यात यशस्वी ठरला.
धनकरच्या पदरी निराशा
दुसरीकडे, धनकरला मॉल्डोव्हाच्या मिहेल साव्हाविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत 6-9 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. प्रारंभी, 0-4 असे पिछाडीवर असताना धनकरने जिद्दीने खेळ साकारला. पण, अंतिमतः त्याला पराभवाचा सामना करावा लागला. धनकरच्या पराभवामुळे भारतीय संघ टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत 74 किलोग्रॅम वजनी गटात आव्हान उभे करु शकणार नाही, हे स्पष्ट झाले. अन्य उपउपांत्यपूर्व लढतीत कादियनने प्युएर्टो रिकोच्या इव्हान ऍमेदोर रामोसविरुद्ध 5-2 असा विजय जरुर संपादन केला. पण, नंतर बल्गेरियाच्या अहमद सुल्तानोव्हिच बताएव्हविरुद्ध त्याला शेवटच्या 20 सेकंदात 4 गुण गमवावे लागल्याने पराभव पत्करावा लागला. अवघ्या भारतीय पथकासाठी हा निकाल धक्कादायक ठरला.
ग्रीको रोमन मल्ल नवीन कुमारची कोरोनामुळे माघार
भारताचा ग्रीको रोमन मल्ल नवीन कुमारला कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे येथे सुरु असलेल्या वर्ल्ड ऑलिम्पिक क्वालिफायर्समधून माघार घ्यावी लागली. 97 किलोग्रॅम वजनगटात खेळणाऱया नवीन कुमारला कोरोनाची लागण होण्याची ही दुसरी वेळ आहे. नवीन कोरोनाग्रस्त असल्याच्या वृत्ताला भारताचे राष्ट्रीय ग्रीको रोमन प्रशिक्षक हरगोबिंद सिंग यांनी दुजोरा दिला.
‘आम्ही पथकातील अन्य सर्व सदस्य निगेटिव्ह आहोत, असे अहवालावरुन स्पष्ट झाले. बुधवारी चाचणीसाठी नमुने घेतले गेले होते. नवीनचा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आला. तो देखील आमच्या हॉटेलमध्येच वास्तव्यास आहे, असे हरगोविंद म्हणाले. सोफिया-बल्गेरियातील येथील मुख्य पात्रता स्पर्धा आजपासून (शनिवार, दि. 8) खेळवली जाणार असून त्यात 97 किलोग्रॅम वजनगटात भारताचे प्रतिनिधीत्व नसेल. यंदा भारताचा एकही ग्रीको रोमन मल्ल ऑलिम्पिकसाठी पात्रता संपादन करु शकलेला नाही.