रशियाच्या युक्रेन धोरणात सौम्यता शक्य, दोन्ही देश चर्चेस तयार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
युक्रेनच्या सुमी भागात अडकलेल्या 694 भारतीय विद्यार्थ्यांना तेथून बाहेर काढण्यात आले आहे. रशियाने दिलेल्या सुरक्षित मार्गाने हे विद्यार्थी युद्धग्रस्त सुमीमधून बाहेर पडले असून त्यांना लवकरच भारतात आणण्यात येत आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या विदेश विभागाने मंगळवारी दिला.
भारताने गंगा अभियानाअंतर्गत आतापर्यंत 16 हजारांहून अधिक नागरीकांना भारतात आणले आहे. मंगळवारीही 468 नागरीक भारतात पोहचले. हे अभियान यशस्वी ठरल्याचे प्रतिपादन भारताने केले आहे. मात्र अजूनही काही भारतीय युक्रेनच्या विविध भागांमध्ये अडकलेले असून त्यांनी त्वरित देशाच्या सीमारेषेकडे जावे, अशी सूचना भारतीय दूतावासाने पुन्हा केली. बांगलादेशी आणि नेपाळी विद्यार्थ्यांची सुटकाही होत आहे. मात्र युक्रेनमधील परिस्थिती चिंताजनक आहे.
चीनचा इशारा
युक्रेनमधील संघर्ष थांबणे आवश्यक आहे. सर्व बाजूंनी जास्तीत जास्त संयम दाखवून परिस्थिती नियंत्रणात आणली पाहिजे, अशी सूचना चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी केली. त्यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी सामोपचारावरच भर दिला आहे.
रशियाच्या धोरणात सौम्यता?
युक्रेनविषयी रशियाचे धोरण दोन आठवडय़ाच्या या युद्धानंतर काही प्रमाणात सौम्य झाल्याचे पहावयास मिळत आहे. तथापि, युक्रेनमधील हल्ल्यांमध्ये खंड पडलेला नाही. रशियाच्या सैनिकांनी महिलांवर अत्याचार सुरु केल्याचा आरोप युक्रेनने केला. रशियन सैनिक मुलांनाही मारत आहेत. काही मुले पिण्याचे पाणी न मिळाल्याने मृत्युमुखी पडली आहेत. युक्रेनमधून अनेक नागरीकांचे पलायन सुरु असून त्यांची संख्या आता 20 लाखांपर्यंत पोहचल्याचा दावा केला जात आहे.
अमेरिका युक्रेनला शस्त्रे देणार
अमेरिकेने युक्रेनला महत्वाची शस्त्रे देण्याचे मान्य केले आहे. अद्याप युक्रेनला युरोपियन देशांचा अपवाद वगळता कोणीही शस्त्रे पुरवलेली नाहीत. अमेरिकेनेही आश्वासन देऊनही अद्याप मोठा शस्त्रपुरवठा केलेला नाही. त्यामुळे अमेरिकेची शस्त्रे येणार केव्हा असा प्रश्न युक्रेनमध्ये विचारला जात आहे. अनेक शहरांमध्ये नागरीकच सैनिक बनले असून त्यांनी रशियाच्या आक्रमणाचा प्रयत्न चालविला आहे. खार्कीव्ह अद्यापही रशियाच्या हाती पडलेले नाही. मात्र, त्याच्या आसपासचा भाग रशियाच्या ताब्यात असून काही छोटी शहरेही शरण आली आहेत.
थेट बोलण्यास तयार
युक्रेन आणि रशिया यांच्यात थेट बोलण्यावर सहमती झाली असून लवकरच निर्णायक चर्चा सुरु होईल, असे मत व्यक्त होत आहे. या युद्धात रशियाची हानीही मोठय़ा प्रमाणात झाल्याचे वृत्त आहे. रशियाचे 12 हजार सैनिक मृत झाल्याचा आणि 80 हून अधिक रणगाडे उद्धवस्त केल्याचा दावा युक्रेनने केला. रशियाची युद्ध विमानेही पडण्यात आली आहेत. युपेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की युक्रेनमध्येच असून आपण कोणत्याही परिस्थितीत शरणागती पत्करणार नाही आणि युक्रेन सोडून जाणारही नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.