वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इटलीतील कॅगलेरी येथे होणाऱया 408,800 एकूण डॉलर्स बक्षीस रकमेच्या एटीपी टूरवरील पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविण्यासाठी सुरू असलेल्या पात्र फेरीत भारताच्या सुमीत नागलने दुसरी फेरी गाठली आहे.
पात्र फेरीच्या पहिल्या सामन्यात सुमीत नागलने इटलीच्या पेलेग्रेनोचा 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये दीड तासांच्या कालावधीत पराभव करत दुसरी फेरी गाठली. आता दुसऱया आणि शेवटच्या फेरीत नागलची लढत फ्रान्सच्या जेनव्हेरशी होणार आहे. या स्पर्धेत पुरूष एकेरीच्या प्रमुख ड्रॉ मध्ये एकूण 40 टेनिसपटूंचा सहभाग राहणार असून त्यापैकी 24 टेनिसपटूंना प्रमुख ड्रॉ मध्ये थेट प्रवेश दिला आहे. हरियाणाच्या 23 वर्षीय नागलने यापूर्वी झालेल्या अर्जेंटिना खुल्या एटीपी 250 स्पर्धेत चिलीच्या द्वितीय मानांकित गॅरीनचा 6-4, 6-3 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. त्यानंतर त्याला या स्पर्धेत स्पेनच्या रॅमोस व्हिनोलासकडून पराभव पत्करावा लागला होता.