श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील बारामुला जिल्हय़ात शुक्रवारी दुपारी दहशतवाद्यांनी गस्तीवर असलेल्या सुरक्षा जवानांवर ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात तीन जवानांसह दोन नागरिक जखमी झाल्याची माहिती देण्यात आली. जखमी झालेल्यांमध्ये दोन सीआरपीएफ जवान आणि एका पोलिसाचा समावेश आहे. बारामुल्ला परिसरातील खानपूरा पुलाजवळ शुक्रवारी दहशतवाद्यांनी सुरक्षा पथकावर हा ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यानंतर सुरक्षा फौजफाटा वाढवण्यात आला असून हल्ला झालेल्या भागाला घेराव घालण्यात आला. सायंकाळी उशिरापर्यंत या भागात शोधमोहीम सुरू होती. दरम्यान, सीमारेषा भागात पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असून सांबा जिल्हय़ामध्ये गुरुवारी रात्री तीन वेगवेगळे ड्रोन नष्ट करण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले आहे. जमिनीवरून घुसखोरी आणि हल्ल्याचा डाव यशस्वी न झाल्याने सीमेजवळच्या गावात ड्रोन हल्ला करण्याचा मनसुबा होता. मात्र त्यांची ही चाल ओळखून सुरक्षा दलाने वेळीच सतर्क राहून ही चाल हाणून पाडली आहे.