धार्मिक शाळा दहशतवाद्यांच्या भरतीचे माध्यम ठरले : पुलवामा हल्ल्यातील सज्जाद सामील
वृत्तसंस्था / श्रीनगर
दक्षिण काश्मीरमधील शोपियां जिल्हय़ातील एक धार्मिक शाळा सुरक्षा यंत्रणांच्यार रडारवर आली आहे. ही शाळा दहशतवाद्यांच्या भरतीचे माध्यम ठरली आहे. गुप्तचर यंत्रणांनी 13 विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी कुठल्या न कुठल्या दहशतवादी संघटनेत सामील झाल्याचे शोधून काढले आहे. या विद्यार्थ्यांमध्ये दहशतवादी सज्जाद भटचेही नाव आहे. सज्जाद हा पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात सामील होता. पुलवामा हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले होते.
या शाळेत शिकणाऱया दक्षिण काश्मीरच्या कुलगाम, पुलवामा आणि अनंतनाग जिल्हय़ातील बहुतांश विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांना दहशतवादी संघटना स्वतःमध्ये सामील करतात. उत्तरप्रदेश, केरळ आणि तेलंगणाच्या अनेक विद्यार्थ्यांनीही या शाळेत प्रवेश घेतला होता. परंतु मागील वर्षी कलम 370 हद्दपार झाल्यावर अशा विद्यार्थ्यांची संख्या शून्य झाल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली आहे.
शोपियां अन् पुलवामाचे अधिक
दहशतवादी सज्जाद भटचे नाव समोर आल्यावर याप्रकरणी तपास सुरू झाला. 13 विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांची नावे या यादीत आहेत. या संस्थेचे शेकडो विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थी ओव्हर ग्राउंड वर्कर आहेत. त्यांच्याकडून दहशतवादी संघटनांना मदत पुरविली जाते. अलिकडेच बारामुल्लाचा एक युवक स्वतःच्या घरातून शाळेत परतताना बेपत्ता झाला होता. तो दहशतवादी गटांमध्ये सामील झाल्याने तपासाअंती समजले होते. या 13 दहशतवाद्यांपैकी बहुतांश जण शोपियां आणि पुलवामाचे रहिवासी आहेत.
प्रमुख दहशतवादी याच शाळेतील
प्रतिबंधित करण्यात आलेल्या अल-बद्र या दहशतवादी संघटनेचा तथाकथित कमांडर जुबैर नेंग्रू देखील याच शाळेत शिकला होता. हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी नाजिम नजीर डार आणि एजाज अहमद पॉल देखील या शाळेशी संबंधित आहेत. या दहशतवाद्यांना 4 ऑगस्ट रोजी एका चकमकीत कंठस्नान घालण्यात आले होते.
कारवाई लवकरच
सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या इनपूटनंतर शोपियांच्या या शाळेवर मोठी देखरेख ठेवली जात आहे. शाळेत बहुतांशी दहशतवादाने प्रभावित जिल्हय़ांमधील मुलेच शिकत असल्याचे तपासात आढळून आले आहे. तपास यंत्रणांचा तपास आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सर्व पुरावे गोळा करण्यात आले आहेत. आता याप्रकरणी कारवाई करण्याची योजना आखली जात आहे. यंत्रणांकडे सर्व संशयितांची नावे आहेत. शाळेच्या विरोधात कारवाई करण्यासाठी संशयितांची यादी तयार करून गृह मंत्रालयाला पाठविण्यात आली आहे. या शाळेचे विदेशी कनेक्शन आहे का याचाही तपास केला जात आहे.