रस्त्यावर पार्किंग केल्याने मोठी गर्दी : समस्या निवारण्यासाठी कालावधी लागणार
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाची धास्ती लागून राहिलेल्या देशात आता अनेकजण गर्दी करणे टाळत आहेत. याच पार्श्वभूमीवर बेळगाव येथील एपीएमसी मार्केटमध्ये गर्दी होतानाचे चित्र दिसत आहे. त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी एपीएमसी प्रशासनाने दुचाकी वाहने रस्त्यावरच पार्किंग करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे बुधवारी सकाळपासूनच या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात दुचाकींची गर्दी दिसून आली.
कोरोनाची साखळी तोडायची असेल तर सुरक्षित अंतर ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र एपीएमसीमधील प्रत्येक मार्केटमध्ये गर्दी दिसून येत आहे. विशेष म्हणजे भाजी मार्केटमध्ये भाजी खरेदी करणाऱयांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे देण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन होताना दिसत आहे.
आज प्रत्येक व्यक्तीकडे दुचाकी आहे. भाजी खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात एपीएमसीमध्ये गर्दी होत असल्यामुळे यावर पर्याय म्हणून दुचाकी पार्किंग एपीएमसी गेटच्या बाहेर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे काही प्रमाणात गर्दी कमी करता येईल व सुरक्षित अंतर ठेवता येईल, या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येत आहे. याबाबत गांभीर्य घेण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
सुरक्षित अंतर ठेवण्याचा प्रयत्न— अनंत पाटील-एपीएमसी अध्यक्ष
देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र जीवनावश्यक वस्तू आणि महत्त्वाचे म्हणजे भाजी खरेदीसाठी एपीएमसीमध्ये गर्दी होत आहे. याचा विचार करून दुचाकी पार्किंगबाहेर करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यामुळे सुरक्षित अंतर ठेवता येईल, असे त्यांनी सांगितले.