ऑनलाईन टीम / चंदीगढ
देशाचे पंतप्रधान हे आपल्या दौऱ्याच्या निमित्ताने अऩेक वेळा चर्चेत असतात ते दौरे परदेशात असो अथवा देशातील. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान सुरक्षेसंदर्भात मोठी चूक असल्याची सांगत मोदींची सभा रद्द करण्यात आलीय. या दौऱ्यादरम्यान मोदींचा ताफा अडवल्याने त्यांची सभाच रद्द करावी लागली आहे. मात्र त्याचवेळी काँग्रेसच्या समर्थकांनी आता मोदींच्या सभेला गर्दीच नसल्याने सुरक्षेचं कारण देऊन सभा रद्द करण्यात आल्याचा दावा सोशल नेटवर्किंगवरुन केला जातोय.
पंतप्रधान मोदींच्या या सभेच्या आधीच आज पंजाबमध्ये पाऊस सुरु झाला. पाऊस आणि खराब दृश्यमानतेमुळे हवाई मार्गाने जाण्याच्या नियोजित कार्यक्रमामध्ये बदल करण्यात आला. भटिंडामध्ये पंतप्रधानांनी हवामान स्वच्छ होण्याची सुमारे २० मिनिटे वाट पाहिली. मात्र, हवामानात सुधारणा न झाल्याने त्यांनी रस्त्याने राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्याचे ठरले. मात्र त्यांचा ताफा हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे ३० किमी अंतरावरील फ्लायओव्हरवर अडवण्यात आला.
दुसरीकडे मोदींच्या सभेच्या ठिकाणी पाऊस पडू लागल्याने अनेकांनी खुर्चा, बॅनर्स आणि इतर प्रचार साहित्य डोक्यावर धरुन पावसापासून आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी सभेला हजारो लोक उपस्थित राहतील अशापद्धतीने आयोजन करण्यात आलं होतं. हजारो खुर्चा या ठिकाणी लोकांना बसण्यासाठी ठेवण्यात आलेल्या. या खुर्चांचा वापर अनेकांनी पाऊस पडाला लागल्यानंतर आसरा घेण्यासाठी केला.