आठवडय़ात 3 दिवस मिळणार सेवा
प्रतिनिधी/ बेळगाव
देशातील वस्त्र नगरी म्हणून ओळख असलेल्या सूरत शहराला आता बेळगावमधील नागरिकांना तासाभराच्या कालावधीत हवाई प्रवास करता येणार आहे. स्टार एअरने येत्या 21 डिसेंबर पासून बेळगाव-सूरत ही विमान सेवा सुरू करत असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे कापड व्यापाऱयांमधून आनंद व्यक्त केला जात असून बेळगावमधून थेट दहा शहरांना विमानसेवा उपलब्ध होणार आहे.
बेळगाव ही एक मोठी बाजारपेठ असल्यामुळे या ठिकाणी देशातील कानाकोपऱयातून व्यापाऱयांची ये-जा असते. तसेच बेळगावचे कापड व्यापारी खरेदीसाठी सूरतला जात असतात. परंतु या व्यापाऱयांना एकतर गाडीने अथवा रेल्वे प्रवास करावा लागत होता. यासाठी वेळ वाया जात असल्याने बेळगावमधून थेट विमानसेवा सुरू करण्याची मागणी व्यापाऱयांमधून होत होती. त्याचबरोबर सूरत परिसरात राहणारे अनेकजण बेळगावमध्ये स्थायीक आहेत. त्यांना येण्या जाण्यासही या मार्गाची मागणी होत होती.
स्टार एअर कंपनीला उडान 3 अंतर्गत बेळगाव-सूरत हा मार्ग मंजूर झाला होता. स्टार एअरच्या ताफ्यात नवीन एअरक्राफ्ट दाखल झाल्यानंतर आता ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. कंपनीने या मार्गासाठी बुकींगही सुरू केले आहे. बेळगाव-सूरत या प्रवासासाठी 2 हजार 500 इतका तिकिटाचा प्राथमिक दर ठेवण्यात आला आहे. यासोबत बेळगावच्या नागरिकांना सूरतमार्गे अजमेर प्रवासही करता येणार आहे. त्यामुळे अजमेर येथील दर्ग्याला जाण्याकरिता ही सेवा अत्यंत सोयीची ठरणार आहे.
अशी असणार विमानसेवा
आठवडय़ातून 3 दिवस सूरत शहराला विमानसेवा उपलब्ध असणार आहे. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस प्रवास करता येणार आहे. बेळगावमधून दुपारी 12 वाजता उड्डाण घेतलेले विमान 1.20 वा. सूरतला पोहोचणार आहे. तर दुपारी 1.50 वा. सूरत येथुन निघालेले विमान दुपारी 3.10 वा. अजमेर (किशनगड) येथे पोहोचणार आहे. तर दुपारी 3.40 वा. अजमेर येथून निघालेले विमान 5 वाजता सुरतला तर सायंकाळी 6.50 वा. बेळगावला पोहोचणार आहे.