ऑनलाईन टीम / सुरत :
कोरोना लढाईत पोलिस आणि आरोग्य कर्मचारी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा आणि सात वर्षांची शिक्षा करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. तरी देखील अजूनही सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ले सुरूच आहेत.
त्यातच अशीच एक घटना गुजरातमधील सुरत शहरातून समोर येत आहे. लॉक डाऊन लागू करत असलेल्या पोलिसांवर तेथील स्थानिक नागरिकांनी दगडफेक केली आहे. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे.
याबद्दल अधिक माहिती देताना सुरतचे पोलिस उपायुक्त आर.बी. बरोट म्हणाले की, पोलिसांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पुढे ते म्हणाले, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दिंडोली भागात काही लोक बिनधास्तपणे घराबाहेर फिरत होते तसेच नियमांचे उल्लंघन देखील करत होते त्यामुळे त्याठिकाणी लॉक डाऊन अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी पी.सी.आर व्हॅन जेव्हा पोहोचली तेव्हा तेथील काही स्थानिक नागरिकांनी त्या व्हॅनवर दगडफेक केली.
पुढे ते म्हणाले, या दगडफेकीत एका पोलिस कर्मचाऱ्याला दुखापत झाली. त्यामुळे पाच लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच या परिसरात अतिरिक्त पोलिसांचा ताफा पाठवण्यात आला असून तेथील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. असेही त्यांनी या वेळी सांगितले.