प्रतिनिधी/ बेळगाव
हिडकल पाणी योजनेतील विद्युतपंप बदलण्याचे काम आणि विद्युतपुरवठा खंडित झाल्यामुळे शहरातील पाणीपुरवठय़ाचे तीनतेरा झाले आहे. शहर आणि उपनगरांतील विविध भागात मागील आठ दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पण सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी आणखी दोन दिवसांचा अवधी लागणार असल्याची माहिती पाणीपुरवठा मंडळाकडून उपलब्ध झाली आहे.
दिवाळी सणाच्या तोंडावरच हिडकल जलाशयाचा पाणीपुरवठा मागील आठ दिवसांपासून बंद आहे. जलाशयातून शहराला जादा पाणीपुरवठा करण्यासाठी पंप बदलण्याचे काम सुरू करण्यात आले होते. सदर काम पूर्ण करण्यासाठी तीन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येईल असे पाणीपुरवठा मंडळाने कळविले होते. मात्र हे काम पूर्ण होण्यास तब्बल आठवडा लागला आहे. तरी देखील शहराला अद्याप सुरळीत पाणीपुरवठा करण्यात आला नाही. हिडकल जलाशयासह दोन पंपहाऊसमधील विद्युतपंप बदलण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर तीन दिवस चाचणी घेण्यात आली. या दरम्यान प्रेशर व्हॉल्वसह काही दुरुस्तीची कामे निघाल्याने पाणीपुरवठा करता आला नाही. दुरुस्तीची कामे पूर्ण करून हिडकल जलाशयामधून शहराला पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर गुरुवारी सकाळी 7 वाजता बसवणकोळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोहोचले आहे. जलशुद्धीकरण करण्यासाठी किमान 4 तासाचा अवधी लागतो. त्यामुळे गुरुवारी दुपारनंतर शहराच्या उत्तर भागातील विविध परिसरात पाणीपुरवठा करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
अशातच हिंडलगा परिसरातील विद्युतपुरवठा खंडित झाल्याने दोन दिवस पाणीपुरवठा ठप्प झाला होता. बुधवारी सायंकाळपासून लक्ष्मीटेकडी जलशुद्धीकरण केंद्रात पाणीपुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे दक्षिण भागातील विविध भागात पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पण सर्व भागात सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी लागणार असल्याची माहिती पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांनी दिली. तसेच हिडकल जलाशयामधून सध्या 9 एमजीडी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दिवाळीनंतर आणखी 6 एमजीडी पाणीपुरवठा सुरू होणार आहे. विस्तारिकरणाचे काम दिवाळीच्या तोंडावर घेण्यात आल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे.