ऑनलाईन टीम / सुरिनाम :
सुरिनाम देशाच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे चंद्रिकाप्रसाद उर्फ चन संतोखी यांची निवड झाली आहे. संतोखी यांनी सार्वत्रिक निवडणुकीत देशाचे हुकूमशहा देसी बुटर्स यांचा पराभव केला. उद्या (दि.16) त्यांचा शपथविधी होणार आहे.
सुरिनाम हा देश दक्षिण अमेरिकेच्या ईशान्य किनारपट्टीवर वसलेला आहे. या देशात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रोग्रेसिव्ह रिफॉर्म पक्षाने एकतर्फी विजय मिळवला. 61 वर्षीय संतोखी आता बुटर्स यांची जागा घेतील. बुटर्स यांनीत्यांच्या कार्यकाळात चीन आणि व्हेनेझुएला यांच्याशी अधिक जवळीक केली. त्यांच्या आर्थिक आणि राजकीय धोरणांचे अनुकरण केले. नेदरलँड्सबरोबर चालणारा व्यापार त्यांनी रसातळाला नेला. बुटर्स यांच्यावर खून आणि अमली पदार्थांच्या तस्करीचे आरोप आहेत.
संतोखी हे या देशाचे पोलिस प्रमुख होते. 2005 पूर्वी त्यांनी कायदामंत्री म्हणूनही काम केले आहे. सुरीनाममध्ये 27 टक्के भारतीय नागरिक राहतात. बुटर्स यांच्या कार्यकाळात वाढलेला भ्रष्टाचार आणि देशाची दिवाळखोरीच्या वाटेवर असलेली अर्थव्यवस्था आणि देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ही संतोखी यांच्यासमोरील आव्हाने असतील.