नवी दिल्ली / वृत्तसंस्था
यंदाच्या गणतंत्रदिनी दिल्लीत होणाऱया मुख्य संचलन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सुरीनाम या दक्षिण अमेरिकेतील देशाचे अध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोखी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्यांच्या देशातील कोरोनाच्या उदेकामुळे भारताचा दौरा रद्द केल्याने संतोखी यांना आमंत्रण देण्यात आले आहे. त्यांनीही या आमंत्रणाचा स्वीकार केला आहे.
गेल्या आठवडय़ात भारताच्या वतीने साजरा झालेल्या प्रवासी दिवसाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानही त्यांनीच स्वीकारले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केले होते.
सुरीनाम या देशात भारतीय वंशाच्या लोकांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. संतोखी हे भारतीय वंशाचेच आहेत. जुलै 2020 मध्ये त्यांची या देशाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यांच्या प्रोग्रेसिव्ह रीफॉर्म पक्षाने या देशातील संसदेच्या 51 पैकी 20 जागांवर विजय मिळविला होता आणि या देशातील हुकुमशाही संपुष्टात आणली होती. त्यांचा पक्ष पूर्वी संयुक्त हिंदुस्थानी पक्ष म्हणून ओळखला जात होता. हा देश पूर्वी हॉलंड या देशाची वसाहत होता.