सेन्सेक्समध्ये 13 अंकांची घसरण पण निफ्टीत किंचीत वाढ
वृत्तसंस्था/ मुंबई
आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजारात चढ-उताराचे वातावरण राहिले होते. सुरूवातीला मजबुतीत सुरू झालेला बाजाराचा प्रवास अखेर घसरणीकडे झुकताना दिसला. सेन्सेक्स किरकोळ अंकांनी घसरत बंद होण्याबरोबर निफ्टी मात्र किंचीत तेजीसह बंद झाल्याचे पाहायला मिळाले.
बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 13 अंकांच्या घसरणीसह 52,372.69 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक या उलट 2.80 अंकांच्या वाढीसह 15,692.60 अंकांवर बंद झाल्याचे पाहायला मिळाले. सेन्सेक्समध्ये जवळपास 500 अंकांचा चढ-उतार सोमवारी पाहायला मिळाला.
शेअरबाजाराचा सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांक सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी तेजीसह खुला झाला. सुरुवातीच्या काही तासात सेन्सेक्स व निफ्टी तेजीचा सूर धरून होते. मात्र, नंतर ही तेजी घटत चालली. सेन्सेक्स निर्देशांक 52,291 अंकांवर तर निफ्टी 15,684 अंकांवर व्यवहार करत होता. सेन्सेक्समधील अधिकतर समभागांची विक्री होत होती.
आशियाई बाजारही सोमवारी तेजीत होता. याचा परिणाम सकाळी भारतीय शेअरबाजारावर दिसला. जपानचा निक्केई 2 टक्क्मयांनी, दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.81 टक्के, तैवानचा वेटेड 1.52 टक्के, शांघाईचा कम्पोझिट 0.27 टक्के, हाँगकाँगचा हँगसेंग 0.49 टक्के आणि सिंगापूरचा स्ट्रेट टाईम्स निर्देशांक 0.44 टक्के तेजी राखून होता. अमेरिकेतील नॅसडॅक बाजार 9 जुलैला 142 अंकाच्या तेजीसह 14701 अंकांवर बंद झाला. युरोपियन बाजारातही 9 जुलैला तेजी होती.
सकाळी सेन्सेक्सचा निर्देशांक 269 अंकाच्या वाढीसह 52,656.15 अंकावर व निफ्टी निर्देशांक 83 अंकाच्या तेजीसह 15,773 अंकावर व्यवहार करत होता. सोमवारी बाजारातील 1672 समभाग तेजीत होते तर 304 समभाग घसरणीत होते. अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक, मारुती सुझुकी, स्टेट बँक, ऍक्सिस बँक व कोटक महिंद्रा बँक यांचे समभाग तेजीत होते. बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक व हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग घसरणीत होते. निफ्टी मिड कॅप निर्देशांक 0.44 टक्के, स्मॉल कॅप निर्देशांक 0.60 टक्के मजबुतीसह बंद झाला. रियल्टी क्षेत्राचा निर्देशांक 3.61 टक्के इतका वाढल्याचे दिसले.