कोल्हापूर / राजेंद्र होळकर
घरात आठराविश्व दारिद्र्य असूनही ऐनी पैकी भैरी (ता.राधानगरी) या धनगरवाड्यातील कु. सुरेखा मालोजी कोकरे या विद्यार्थीनीने प्रचंड मेहनतीने आणि जिद्दीने माध्यमिक शालांत परीक्षेत (SSC) 95.00% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.
धनगरवाड्यावरील आठराविश्व दारिद्र्यमुळे कु. सुरेखाच्या आई, वडीलांनी पोट पाण्यासाठी कोल्हापूरला जवळ केले. तिची आई सौ. सुनीता मोलकरणीचे काम करते. तर तिचे वडील मालोजी कोकरे हे हमाली व मजुरीची कामे करु लागले. घरची परिस्थिती दारिद्र्या असूनही, कु. सुरेखाचे शिक्षणाविषयी असलेली आस पाहून तिच्या आई, वडीलानी तिला शिकविण्याचा निर्णय घेतला. याकरीता तिला गगनबावडा येथील कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृह आश्रमशाळाकृत वसतिगृहात ठेवण्यात आले. तिने येथे राहून गगनबावडा मधील परशराम विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज या शाळेत शिक्षण घेवू लागली. तिने माध्यमिक शालांत परीक्षेत प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर या परीक्षेत(SSC) 95.00% गुण मिळवून घवघवीत यश संपादन करून, आई वडिलांची, गुरुजनांची व समाजाची मान उंचावली आहे.
तिला हवी पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज
‘सुरेखा’ ला आतापर्यत तिच्या शाळेतील शिक्षकांनी वेळोवेळी हवी ती आर्थिक मदत केली आहे. पण या हुशार व होतकरु आणि सामाजिक जाणीव असलेल्या सुरेखाला तिच्या पंखांना बळ देण्यासाठी पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.