मुंबई इंडियन्सच्या सराव सत्राला प्रारंभ, रोहित, बुमराह पथकात दाखल
मुंबई / वृत्तसंस्था
मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पहिल्या लढतीत खेळेल, त्यावेळी स्टार फलंदाज सुर्यकुमार यादव उपलब्ध असण्याची शक्यता कमी आहे. सुर्यकुमार यादव अंगठय़ाला झालेल्या हेअरलाईन प्रॅक्चरवर उपचार करुन घेत असून तो 27 मार्च रोजी होणाऱया या पहिल्या लढतीपूर्वी यातून सावरणे कठीण असल्याचे चित्र आहे.
मुंबई इंडियन्सने रिटेन केलेल्या 4 खेळाडूंमध्ये समावेश असलेल्या सुर्यकुमारला विंडीजविरुद्ध टी-20 मालिकेदरम्यान दुखापत झाली आणि याच दुखापतीमुळे तो श्रीलंकेविरुद्ध मालिकेत देखील खेळू शकला नाही.
‘सुर्यकुमार यादववर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचार सुरु आहेत आणि त्याचा प्रतिसादही उत्तम आहे. पण, सलामी लढतीत खेळण्याची शक्यता अगदीच कमी आहे’, असे बीसीसीआयमधील एका वरिष्ठ सूत्राने गोपनियतेच्या अटीवर सांगितले.
मुंबई इंडियन्ससाठी कर्णधार रोहित शर्मा, 15.25 कोटी रुपयाच्या बाय-बॅकसह करारबद्ध इशान किशन यांच्यासह सुर्यकुमार देखील महत्त्वाचा खेळाडू असून ते सुर्यकुमारला पूर्ण तंदुरुस्त नसताना खेळवण्याचा फारसा धोका पत्करणार नाहीत, असे सध्याचे चित्र आहे.
पहिल्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सला पाच दिवसांची विश्रांती मिळणार असून ते दि. 2 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध दुसऱया लढतीत खेळतील. त्यावेळी सुर्यकुमार संघात परतण्याची शक्यता अधिक असेल, असा होरा आहे. सुर्यकुमार यादव यापूर्वी विंडीजविरुद्ध टी-20 मालिकेत उत्तम बहरात राहिला आणि त्याला मालिकावीर पुरस्कारही प्राप्त झाला होता.
रोहित, बुमराहचे आगमन
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा व त्याचे कुटुंबीय, जलद गोलंदाज जसप्रित बुमराह संघाच्या बायो-बबलमध्ये दाखल झाले. बबल टू बबल ट्रान्स्फर असल्याने त्यांना तीन दिवसांचे हार्ड क्वारन्टाईन लागू नसेल. जे खेळाडू बबल टू बबल ट्रान्स्फर होतील, त्या सर्व खेळाडूंना ही मुभा असणार आहे.
आयपीएल स्पर्धेत प्रत्येक संघांना दोन डीआरएस
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सर्व प्रँचायझींना प्लेईंग कंडिशन्सची माहिती दिली असून यानुसार प्रत्येक संघाला यापुढे 2 डीआएस घेता येणार आहेत. याशिवाय, एमसीसीने अलीकडेच जाहीर केलेले नवे नियम देखील येथे लागू केले जाणार आहेत. यामध्ये चेंडूला लकाकी आणण्यासाठी सलायव्हा न लावणे, मंकडिंगला अधिकृत मान्यता यांचा प्राधान्याने समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सदर नवे नियम ऑक्टोबरपासून अमलात आणले जाणार आहेत.
शेन वॅटसन दिल्ली कॅपिटल्सचा सहायक प्रशिक्षक
मुंबई ः आयपीएल प्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सने माजी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू शेन वॅटसनची आगामी हंगामासाठी सहायक प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. 40 वर्षीय शेन वॅटसन लवकरच दिल्लीच्या प्रशिक्षण पथकात समाविष्ट होत असून यात रिकी पाँटिंग (मुख्य प्रशिक्षक), प्रवीण आमरे (सहायक प्रशिक्षक), अजित आगरकर (सहायक प्रशिक्षक), जेम्स होप्स (गोलंदाजी प्रशिक्षक) यांचा समावेश आहे.
‘आयपीएल ही जागतिक स्तरावरील सर्वोत्तम टी-20 लीग असून खेळाडू या नात्याने मी या स्पर्धेत बरेच यश अनुभवले. 2008 मध्ये राजस्थान रॉयल्सच्या विजेत्या संघात मी समाविष्ट होतो आणि त्यानंतर आरसीबी व चेन्नई सुपरकिंग्स संघाकडून खेळण्याचा अनुभवही उत्तम होता. आता या स्पर्धेत रिकी पाँटिंग मुख्य प्रशिक्षण देत असताना सहायक प्रशिक्षकपदी कार्यरत राहण्याची संधी माझ्यासाठी विशेष महत्त्वाची असेल’, असे वॅटसन याप्रसंगी म्हणाला.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलूंमध्ये गणल्या जाणाऱया शेन वॅटसनचा 2007 व 2015 मधील वनडे विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघात समावेश होता. याशिवाय, 2012 टी-20 विश्वचषक स्पर्धेत त्याने मालिकावीर पुरस्कार जिंकला. मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात या दिग्गज खेळाडूने 7 हजारपेक्षा अधिक धावा व 200 पेक्षा अधिक बळी नोंदवले असून ऑस्ट्रेलियातर्फे 190 वनडे व 58 टी-20 सामन्यात प्रतिनिधीत्व केले आहे.
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत त्याने राजस्थान रॉयल्स, आरसीबी व चेन्नई संघाचे प्रतिनिधीत्व केले असून यात दोनवेळा (2008-राजस्थान व 2018-चेन्नई) तो जेतेपदाचा साक्षीदार ठरला.