अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियावर पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 गोल्सनी मात
वृत्तसंस्था/ जोहोर बहरू, मलेशिया
दोन वेळा स्पर्धा जिंकणाऱया भारताच्या कनिष्ठ हॉकी संघाने दहाव्या सुलतान जोहोर चषक हॉकी स्पर्धेचे तिसऱयांदा जेतेपद पटकावताना अंतिम फेरीत पेनल्टी शूटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियाचा 5-4 अशा गोलफरकाने पराभव केला. गेल्या पाच वर्षांपासून भारताला ही स्पर्धा जिंकण्यात यश आले नव्हते. ती मालिका भारताने यावेळी खंडित केली.
दोन्ही संघांनी निर्धारित वेळेत 1-1 अशी बरोबरी साधली होती. त्यानंतर शूटआऊटमध्येही दोन्ही संघांनी 3-3 अशी बरोबरी केली. त्यामुळे सडनडेथचा अवलंब करण्यात आला. यातही तब्बल 9 पेनल्टी शॉट्सनंतर सामन्याचा निकाल लागला. ऑस्ट्रेलियाचा पहिला फटका कूपर बर्न्सने घेतला. त्यावर भारतीय गोलरक्षक मोहित शशीकुमारने अप्रतिम बचाव केला. भारताचा पहिला फटका विष्णुकांत सिंगने मारला. त्याने गोलरक्षकाच्या वरून चेंडू मारत गोल नोंदवला. लियाम हार्टने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱया फटक्यावर त्यांचा पहिला गोल केला. त्यानंतर भारताच्या सुदीपने वाईड फटका मारल्याने टायब्रेकरमध्ये 1-1 अशी बरोबरी झाली.
नंतर मोहितने जेडेन ऍडकिन्सनचा फटका वाया घालविला तर भारताचा कर्णधार उत्तम सिंगने पेनल्टी स्ट्रोक मिळविला. त्यावर शारदानंद तिवारीने गोल नोंदवत 2-1 अशी बढत घेतली. पुढच्या फटक्यावर ऑस्ट्रेलियाला जोशुआ ब्रूक्सने 2-2 अशी बरोबरी साधून दिली. मात्र बॉबी सिंग धामीने आपला फटका वाया घालविला. पुढच्या प्रयत्नात ऑस्ट्रेलियाने पेनल्टी स्ट्रोक मिळविला, त्यावर जोशुआ ब्रूक्सने गोल नोंदवला. अंकित पालने गोल नोंदवून भारताला पुन्हा 3-3 अशी बरोबरी साधून दिल्यानंतर सडनडेथचा अवलंब करण्यात आला.
सडनडेथमध्ये विष्णुकांतने पहिलाच फटका हुकवला तर ऑस्ट्रेलियाच्या हार्टचा फटका बारला लागून वाया गेला. नंतर उत्तम सिंगने गोल नोंदवून भारताला 4-3 अशी आघाडी मिळवून दिली. पण बर्न्सने ऑस्ट्रेलियाला 4-4 अशी बरोबरी साधून दिली. बॉबीनेही आपला फटका पुन्हा हुकवला, पण ब्रॉडीने आपला फटका वाईड मारल्याने बरोबरी कायम राहिली. सुदीपने संयम राखत पुढच्या फटक्यावर भारताचा पाचवा गोल केला तर जोशुआचा फटका हुकल्यानंतर भारतीयांनी जल्लोष सुरू केला.
निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी वेगवान खेळ केला. सुरुवातीला ऑस्ट्रेलियाने काही काळ वर्चस्व गाजविले, तेव्हा उत्तम व बॉबी सिंग यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले होते. 14 व्या मिनिटाला या प्रयत्नांना यश आले. सुदीपने हा गोल नोंदवून भारताला आघाडीवर नेले. दुसऱया सत्रात 29 व्या मिनिटाला जॅक हॉलंडने ऑस्ट्रेलियाला बरोबरी साधून दिली आणि दोन्ही संघांनी जोरदार प्रयत्न करूनही निर्धारित वेळेत बरोबरी कायम राहिली होती. त्याआधीच्या सामन्यात भारताने ब्रिटनला 5-5 असे बरोबरीत रोखले होते.
भारताने वयोगटाची ही स्पर्धा यापूर्वी 2013 व 2014 मध्ये जिंकली होती. त्यानंतर 2012, 2015, 2018, 2019 यावर्षी उपविजेतेपद मिळविले. 2020 व 2021 मध्ये कोरोनामुळे ही स्पर्धा घेण्यात आली नव्हती.
हॉकी इंडियाकडून प्रत्येकी 2 लाखाचे बक्षीस घोषित
सुलतान जोहोर चषक हॉकी स्पर्धा जिंकणाऱया भारतीय कनिष्ठ संघातील प्रत्येक खेळाडूला हॉकी इंडियाने प्रत्येकी 2 लाखाचे बक्षीस जाहीर केले. याशिवाय सपोर्ट स्टाफला प्रत्येकी एक लाख रुपये दिले जाणार आहेत. ‘संघाने या सामन्यात झुंजार खेळ करीत अखेरपर्यंत प्रयत्न सोडले नाहीत. गेले दोन महिने त्यांनी केलेल्या कठोर परिश्रमाचे हे फलित आहे. पुढील वर्षी मलेशियात विश्वचषक स्पर्धा होणार असून आपला संघ आत्मविश्वासाने त्यात उतरून यशस्वी कामगिरी करेल,’ अशी आशा हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोलानाथ सिंग यांनी व्यक्त केली.