इराणच्या सर्वोच्च नेत्यालाही अश्रू अनावर : अमेरिकेच्या विरोधातील संताप पुन्हा झाला व्यक्त
वृत्तसंस्था/ तेहरान
इराणचे सर्वोच्च सैन्य कमांडर कासिम सुलेमानी यांच्या अंत्यसंस्काराला देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामनेई यांनी उपस्थित राहत श्रद्धांजली वाहिली आहे. तेहरानमध्ये सोमवारी अत्यंत भावनात्मक पद्धतीने खामनेई यांनी सैन्य कमांडरला अखेरचा निरोप दिला आहे. या पूर्ण घटनेदरम्यान खामनेई अत्यंत भावुक दिसून आले तसेच त्यांना अश्रू अनावर झाल्याचे कॅमेऱयात कैद झाले आहे. इराणमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या सुलेमानी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर उपस्थित होता.
तेहरान विद्यापीठात सुलेमानी यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठय़ा संख्येने लोक पोहोचले होते. स्थानिक रहिवाशांनी कमांडरचे फलक झळकवून घोषणा दिल्या आहेत. उपस्थित लोकांनी खामनेई यांच्यासोबत सुलेमानी यांच्यासाठी अखेरची प्रार्थना केली आणि यादरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अत्यंत भावुक झाल्याने जगाने पाहिले आहे.
अमेरिकेच्या विरोधात घोषणाबाजी
इराणच्या नागरिकांनी सुलेमानी यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या आहेत. इराणच्या नागरिकांमध्ये सुलेमानी अत्यंत लोकप्रिय होते. स्थानिकांनी अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधात घोषणाबाजी करत सूड घेणार असल्याचे म्हटले आहे.
आण्विक कराराचे पालन नाही
अमेरिकेसोबत वाढलेल्या तणावानंतर इराणने आता 2015 च्या आण्विक कराराच्या अंतर्गत लागू करण्यात आलेले कुठलेच बंधन मान्य करणार नसल्याची घोषणा केली आहे. तेहरानमध्ये इराणच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आण्विक संवर्धनासाठी स्वतःची क्षमता, त्याची पातळी, संपृक्तीकरण करण्यासाठी अन्य सामग्रीचा साठा करणे, संशोधन करण्यासंबंधीचे कुठलेच जागतिक बंधन मान्य करणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
शिंजो आबे यांची मध्यस्थी
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावावर चिंता व्यक्त केली आहे. मध्यपूर्वेत उद्भवलेल्या तणावामुळे चिंता निर्माण झाल्याचे आबे यांनी म्हटले आहे. आण्विक करारासंबंधी वाद निर्माण झाल्यावर आबे यांनी इराणचा दौरा करत राष्ट्रपती हसन रुहानी यांच्याशी चर्चा केली होती. या पार्श्वभूमीवर इराण-अमेरिका यांच्यातील वाढलेला तणाव दूर करण्यासाठी आबे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे मानले जात आहे. 1979 ची इस्लामिक क्रांती तसेच आण्विक कार्यक्रमासंबंधी इराणचे युरोपीय देशांसोबत तणावाचे संबंध असतानाही जपानशी त्याचे सौहार्दपूर्ण संबंध राहिले होते.
इराणी वंशाच्या नागरिकांना रोखले
अमेरिकेत स्थायिक झालेल्या इराणी वंशीय नागरिकांना तणावाचा फटका बसत आहे. कॅनडाच्या दौऱयावरून परतणाऱया अनेक इराणवंशीय नागरिकांना सीमेवरच रोखण्यात आले आहे. सुलेमानी यांच्या मृत्यूप्रकरणी इराणकडून सूड घेण्याची धमकी देण्यात आल्याने अमेरिकेच्या गृह विभागाने सीमेवरील सुरक्षा वाढविली आहे. कॅनडाचा दौरा करून परतणाऱया 60 हून अधिक जणांना वॉशिंग्टन प्रांताच्या ब्लेन सीमेवर रोखण्यात आले आहे. सुरक्षा अधिकाऱयांनी राजकीय भूमिका तसेच निष्ठेसंबंधी या नागरिकांना प्रश्न विचारल्याचे समजते. बहुतांश जणांना अतिरिक्त चौकशीनंतर सोडण्यात आले आहे. तर काही जणांना अमेरिकेत प्रवेश देण्यात आला नसल्याचा दावा करण्यात आला आहे.