आर्थिक व्यवहारातून घडली घटना
सुळगा–येळ्ळूर येथे आर्थिक व्यवहारातून एका तरुणावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली असून जखमी तरुणाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यासंबंधी त्याच गावातील एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.
किशोर परशराम नावगेकर (वय 29 रा. सुळगा येळ्ळूर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो व्यवसायाने टिप्पर चालक आहे. या प्रकरणी सुरज कुकडोळकर (वय 24) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुनील कुमार नंदेश्वर यांनी ही कारवाई केली आहे.
किशोर हा सुरजच्या टिप्परवर चालक होता. पगारापोटी सुरजकडून त्याला पैसे यायचे होते. पैशाची मागणी केल्यामुळे हिशोब करूया ये असे सांगून किशोरला बोलावून घेऊन त्याच्यावर चाकूहल्ला केल्याचे सांगण्यात आले. बेळगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.