उपाध्यक्षपदी दत्ता पवार यांची निवड चिठ्ठीद्वारे
वार्ताहर / सुळगे (येळ्ळूर)
सरकारी आदेशानुसार पहिल्या टप्प्यात सुळगे (ये.) ग्रामपंचायत निवड प्रक्रिया पार पडली. गंगव्वा सिद्धाप्पा नाईक यांची अध्यक्षपदी तर दत्ता पवार यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. सुळगे ग्रामपंचायतीत सुळगे, राजहंसगड व यरमाळे या तीन गावांचा समावेश आहे.
सोमवारी सकाळी सुळगे ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक अधिकारी एस. बी. हालान्नवर (वॉटर सप्लाय बेळगाव) यांनी कामकाजाला सुरुवात केली. अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव असलेल्या अध्यक्षपदासाठी गंगव्वा नाईक यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाले.
चिठ्ठीने विजयी
उपाध्यक्षपदाची जागा सामान्य होती. या जागेसाठी दत्ता जोतिबा पवार (राजहंसगड) व हणमंत रायाप्पा बोरख (यरमाळे) यांच्यात सरळ लढत झाली. दोघांनाही समान 5-5 मते मिळाली. नंतर चिठ्ठीद्वारे दत्ता पवार यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
मतदानासाठी साहाय्यक अधिकारी म्हणून यु. बी. शिगेहळ्ळी, पीडीओ दुर्गाप्पा तहसीलदार यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सूत्रसंचालन सचिव अमित कुकडोळकर यांनी केले.
नूतन ग्रामपंचायत अध्यक्षा गंगव्वा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. प्रास्ताविक व स्वागत बी. बी. पाटील यांनी केले. माजी चेअरमन व विद्यमान सदस्य अरविंद पाटील यांच्या यशस्वी कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. ग्रा. पं. अध्यक्षा गंगव्वा नाईक, सदस्य अरविंद पाटील, यमुनाताई पाटील, हणमंत गोरल, रेणुका महार यांनी भावकेश्वरी देवीसह इतर देवस्थाने, छत्रपती शिवाजी महाराजांना सिद्धाप्पा छत्रे यांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आला. यावेळी एस. एम. बेळवटकर, बसवंत पवार, प्रभाकर नावगेकर, रामा यरमाळेसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.