बंद घर फोडून चोरटय़ांचा प्रताप
प्रतिनिधी/ येळ्ळूर
बंद घराचा दरवाजा फोडून चोरटय़ांनी तिजोरीतील रोख 15 हजार आणि 6 तोळे चांदी चोरून नेल्याची घटना सुळगे-येळ्ळूर येथे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे सुळगे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सुळगा-देसूर रोडवरील नारायण कृष्णा पाटील यांच्या घरात ही चोरी झाली आहे.
घर बंद करून सर्वजण शेताकडे गेले होते. यावेळी चोरटय़ांनी घराचा पाठीमागील दरवाजा फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी रॉडने तिजोरीचा दरवाजा फोडला. त्यामधील रोख 15 हजार आणि सहा तोळय़ाचे चांदीचे दागिने चोरटय़ांनी पळविले. शेताहून घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. यानंतर बेळगाव ग्रामीण पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. येळ्ळूर, सुळगा, धामणे परिसरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चोरटय़ांनी मंदिरांमधील देवी-देवतांचे दागिने याच बरोबर दानपेटीमधील रक्कम चोरून नेली होती. आता बंद घरांना लक्ष्य बनविण्यात आले असून या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी चोरटय़ांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.