ऑपरेशन ब्ल्यू स्टारला 37 वर्षे पूर्ण ः भिंद्रनवालाचा पुत्र उपस्थित
वृत्तसंस्था/ अमृतसर
ऑपरेशन ब्ल्यू स्टारला 37 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रविवारी अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हजारोंच्या संख्येत पोहोचलेल्या भाविकांनी दरबार साहिबमध्ये डोकं टेकविले आहे. तर खलिस्तान समर्थकांनी घोषणांसह तलवारी हवेत फिरविल्या आहेत. त्यांच्या हातात ‘खलिस्तान जिंदाबाद’ आणि ‘खलिस्तान साडा हक है’ असे फलक दिसून आले. तसेच भिंद्रनवालाचे पोस्टरही झळकविले गेले. कार्यक्रमात लाल किल्ला हिंसेचा आरोपी दीप सिद्धूही पोहोचला.
1984 मध्ये पार पडलेल्या ऑपरेशन ब्ल्यू स्टारला 37 वर्षे पूर्ण झाल्याने आयोजित कार्यक्रमात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबीयांसह जरनैल सिंग भिंद्रनवालाचा पुत्र ईश्वर सिंगही पोहोचला होता. या कार्यक्रमावेळी काही जणांनी खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या आहेत.
अनेक जुने खलिस्तान समर्थक आणि दहशतवादी कारवायांमध्ये सामील राहिलेले लोकही यावेळी तेथे पोहोचले होते. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व मार्गांवर मोठय़ा संख्येत पोलीस आणि अन्य सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते.