उत्तर कर्नाटकातील 7 जिल्हय़ांच्या माहिती आयोगाची प्रकरणे बेळगावात निकालात काढली जाणार
प्रतिनिधी / बेळगाव
सुवर्णसौधमध्ये सरकारी कार्यालये सुरू करावीत, अशी मागणी वारंवार होत होती. त्याची दखल मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा सरकारने घेत सुवर्णसौधमध्ये शुक्रवारपासून माहिती आयोगाचे कार्यालय सुरू केल्याचे माहिती आयोगाच्या आयुक्त बी. व्ही. गीता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हे कार्यालय मार्चमध्येच सुरू करण्यात येणार होते. मात्र कोरोनामुळे उशीर झाला असून आता हे कार्यालय या ठिकाणी होत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
उत्तर कर्नाटकातील 7 जिल्हय़ांच्या माहिती आयोगाची प्रकरणे या ठिकाणी निकालात काढली जाणार आहेत. बेळगाव, धारवाड, विजापूर, बागलकोट, गदग, हावेरी आणि कारवार या जिल्हय़ांतील प्रकरणे या ठिकाणी निकालात काढली जाणार आहेत. यापूर्वी यासाठी बेंगळूरला धाव घ्यावी लागत होती. मात्र आता उत्तर कर्नाटकासाठी या ठिकाणी हे कार्यालय सुरू केल्याची माहिती बी. व्ही. गीता यांनी दिली आहे.
माहिती आयोगाकडे जवळपास 4 हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. ती तातडीने निकालात काढण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या कार्यालयाबाबत बेळगाव जिल्हय़ासह इतर 7 जिल्हय़ांमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. माहिती आयोगांतर्गत विविध विभागांची माहिती घेतली जाते. मात्र बऱयाचवेळा माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येते. त्यांना आळा बसणार आहे. व्हिडिओ संवादाच्या माध्यमातूनही ही प्रकरणे निकालात काढण्यात येणार आहेत.
उत्तर कर्नाटकातील जनतेला होणार फायदा
सुवर्णसौधमध्ये ये-जा करण्यासाठी बेळगावातून सध्या तीन बसेस सुरू करण्यात येणार आहेत. त्यानंतर गरजेनुसार बसची संख्या वाढविली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. सुवर्णसौधमध्ये माहिती आयोगपीठ सुरू झाल्याने आता उत्तर कर्नाटकातील जनतेला त्याचा फायदा होणार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.