ऑनलाईन टीम / चंदीगढ :
येत्या 23 जुलैपासून टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंना सरकारी नोकरी आणि 6 कोटी रुपयांची बक्षिसे देण्याचे आश्वासन हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिले आहे.
ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंशी संवाद साधताना खट्टर म्हणाले, क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने नवी रणनीती आखली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या खेळाडूंना सरकारी नोकरी देण्यात येईल. तसेच 3 टक्के आरक्षणाने सरकारी सेवा दिल्या जातील. या खेळाडूंनी प्रशिक्षक म्हणून काम केल्यास क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल.
दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकसाठी हरियाणातून 30 खेळाडूंची निवड करण्यात आली असून, त्यांना या स्पर्धेच्या तयारीसाठी 5 लाख रुपये मदत देण्यात आली आहे. या स्पर्धकांपैकी सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना 6 कोटी रुपयांचे, रौप्य पदक विजेत्यांना 4 कोटी रुपयांचे तर कांस्य पदक विजेत्यांना 2.5 कोटी रुपयांचे बक्षिस देण्यात येईल, असे क्रीडा राज्यमंत्री संदीप सिंह यांनी सांगितले.