ऑनलाईन टीम / बिहार :
सुशांतच्या आत्महत्याप्रकरणी तात्काळ तपास करा, अशी मागणी सुशांतची बहीण श्वेता सिंह हीने ट्विट करत केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील तिनेे टॅग केले आहे.
सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने आपल्या ट्विट मध्ये म्हटले की, मी सुशांत सिंह राजपूतची बहिण आहे आणि तुम्ही या प्रकरणाकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मी विनंती करते. आमचा भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्याल अशी मी अपेक्षा करते’ असे म्हणत, आपल्या ट्विट मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केले आहे.
ट्विट मध्ये पुढे ती म्हणाली, नमस्कार सर, माझ्या मनात कुठे तरी असे वाटते की तुम्ही सत्याच्या बाजूने आहात. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील आहोत. ज्यावेळी माझा भाऊ बॉलिवूडमध्ये होता तेव्हा त्याच्या कोणी गॉडफादर नव्हता आणि आताही नाही. या प्रकरणाकडे तातडीने लक्ष द्यावे आणि या प्रकरणातील पुराव्यांसोबत कोणतीही छेडछाड होणार नाही अशी मी विनंती करते.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी त्याची कथित प्रेयसी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यावर फसवणुकीचा आणि सुशांत ला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा सुशांतच्या वडिलांनी दाखल केला आहे. यानंतर शुक्रवारी रिया चक्रवर्तीच्या वकीलांनी शुक्रवारी रियाचा व्हिडीओ शेअर करत सत्याचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला होता.