एकता कपूरची ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका 2009 मध्ये प्रसारित झाली होती. या मालिकेतील अर्चना आणि मानवची जोडी खूपच लोकप्रिय झाली होती. मानवची भूमिका दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने तर अर्चनाची भूमिका अंकिता लोखंडे हिने साकारली होती. या मालिकेलाही खूपच लोकप्रियता लाभली. पवित्र रिश्ता मालिकेचे 1424 भाग प्रसारित झाले होते
आता या मालिकेचे दुसरे पर्व म्हणजेच ‘पवित्र रिश्ता 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही मालिका ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. मालिकेत अंकिता लोखंडे आणि इतर काही जुने कलाकार पुन्हा दिसणार आहेत. परंतु सुशांतने साकारलेली मानवची भूमिका आता शाहीर शेख साकारणार आहे.
पवित्र रिश्ता 2 मध्ये मानवच्या भूमिकेतील शाहीरचा फर्स्ट लूकही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘अनेकांनी मला तू ही भूमिका साकारू नको असा सल्ला दिला होता,’असे मनोगत शाहीरने व्यक्त केले. तो म्हणाला की, ‘जेव्हा मानव या भूमिकेसाठी मला विचारणा झाली तेव्हा होकार द्यायचा की नाही याचा मी विचार करू लागलो.’ तेव्हा अनेकांनी मला ही भूमिका साकारण्याबाबत अनेक पश्न विचारले. कारण सुशांतने साकारलेली ही भूमिका खूपच लोकप्रिय झाली होती. त्यामुळे प्रेक्षकांच्या माझ्याकडूनही खूप अपेक्षा असणार हे स्वाभविक होते. त्यामुळे ही भूमिका करावी की नाही याबाबत मी खूप संभ्रमात होतो. त्यात अनेकजण मला याबाबत प्रश्न विचारत असल्याने मी अधिक नर्व्हस होऊ लागलो. खरे तर प्रेक्षक मला स्वीकारतील की नाही, हा प्रश्न सगळ्यात आधी माझ्या मनात आला होता.