प्रतिनिधी /बेळगाव
हिंडलगा कारागृहामध्ये शिक्षणातील परिवर्तन या उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या अभ्यास वर्गांना लोकशिक्षण खात्याच्या सुषमा गोडबोले यांनी भेट दिली. त्यावेळी कैद्यांना उद्देशून बोलताना त्या म्हणाल्या, आपण जीवनात एखाद्या चुकीच्याक्षणी काही गैरकृत्य केले असेल. तथापि येथे आल्यानंतर स्वतःमध्ये बदल घडविणे तुमच्या हातात आहे. अभ्यासवर्गाचा लाभ घेवून तुम्ही सुशिक्षित व्हा तसेच इतरांनाही प्रेरीत करा.
अक्षर ज्ञानाबरोबरच कारागृहात असणाऱया विविध कौशल्य योजनांच्या प्रशिक्षणाचाही तुम्ही लाभ घ्या. म्हणजे पुढे तुम्ही स्वावलंबन होवून अर्थार्जन करू शकाल. जिल्हा प्रौढ शिक्षणाधिकारी जयश्री एम. यांनी शिक्षण खात्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले. अध्यक्षस्थानी असलेले कारागृहाचे अधीक्षक कृष्णकुमार यांनी हा कार्यक्रम यशस्वी होत असल्याचे सांगितले.
यावेळी मल्लिकार्जुन, महम्मद, इराप्पा, महांतेश, मधुसुदन यांनी आपले अनुभव कथन केले. धारवाड जिल्हा प्रौढ शिक्षणाधिकारी खाजी, तालुका संशोधक हनुमंत बजंत्री, राजकुमार कुंभार, जेलर अभिषेक आदी उपस्थित होते. सहाय्यक अधिक्षक शहाबुद्दीन यांनी प्रास्ताविक केले. शशिकांत यादगुडे यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले.