नेटफ्लिक्सवर दिसणार लव्ह ट्राएंगलची धमाल
शाहरुख खानची कन्या सुहानासोबत श्रीदेवीची छोटी मुलगी खुशी कपूर आणि सैफ अली खानचा पुत्र इब्राहिम याच्या बॉलिवूडमधील पदार्पणाची चर्चा आहे. हे तिघेही एकाच चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही तिन्ही स्टार किड्स जोया अख्तरच्या चित्रपटातून एकत्रितपणे नेटफ्लिक्सवर झळकळणार आहेत.
सुहाना, खुशी आणि इब्राहिम यांच्या बॉलिवूडमधील पदार्पणासंबंधी दीर्घकाळापासून चर्चा सुरू आहे. लवकरच या स्टार किड्सचे अभिनयाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. जोया अख्तरने इंटरनॅशनल कॉमिक बुक ‘आर्ची’च्या भारतीय आवृत्तीसाठी काही नावे निश्चित केली असून यात सुहाना सोबत खुशी आणि इब्राहिम देखील सामील आहे. सुहाना या चित्रपटात देसी बेट्टीच्या व्यक्तिरेखत दिसून येईल. तर खुशी कपूर ही वेरोनिकाच्या भूमिकेत असू शकते.
नेटफ्लिक्सवर येणाऱया या प्रोजेक्टचा उर्वरित तपशील सध्या गुप्त ठेवण्यात आला आहे. जोयाच्या या चित्रपटात सैफ आणि अमृता सिंगचा पुत्र इब्राहिम हा आर्चीच्या भूमिकेत दिसणार असल्याचे समजते. ‘आर्ची’ एक इंटरनॅशनल कॉमिक बुकची सीरिज असून त्यावर जोया अख्तर इंडिय अडॉप्शन करून चित्रपट निर्माण करण्याच्या तयारीत आहे. या कॉमिक कथेची पार्श्वभूमी प्रेमाच्या त्रिकोणावर आधारित आहे.