प्रतिनिधी / सोलापूर
अशोक चौक ते शांती चौक दरम्यानच्या व्हिवको प्रेसेस समोरील रस्त्यावरुन ओमनी कारमधून आलेल्या चारजणांनी सूत व्यापाऱयाचा अपहरणाचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखून वाचवा…वाचवा अशी आरडाओरड केल्याने अपहरणकर्त्यांनी त्यांना चालत्या गाडीतून ढकलून दिले. ही घटना मंगळवारी सकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, राजय्या प्रभाकर गज्जम (वय 43, रा. चिप्पा भाजी मार्केटच्या मागे) त्यांचा सूत खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. व्यापाराला सुरुवात करण्यापूर्वी ते व्हिवको प्रोसेसजवळील श्रीलक्ष्मी मंदिरात दर्शन घेण्यासाठी जातात. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास त्यांच्याकडील (एमएच 13/सीपी/3910) स्कुटरवरुन गेले होते. साधारण 15 मिनिटांनी ते मंदिरातून बाहेर पडले. त्यावेळी साधारण 35 वर्षे वयाच्या तरुणाने तुमच्या गाडीचे हप्ते थकलेले आहेत का? अशी विचारणा केली. त्यावर गज्जम यांनी गाडी रोख घेतल्याचे सांगताच अपहरणकर्त्याने ओमनी कारमधील इतर साथीदारांना ‘ये, ती लिस्ट आण रे’…असे सांगितले. त्याबरोबरच कारमधील तीन तरुण गज्जम यांच्याजवळ आले. त्या तिघांनी गज्जम यांना पकडून कारमध्ये घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी गज्जम यांनी वाचवा… वाचवा अशी आरडाओरड केली. गोंधळ ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाल्याचे पाहून अपहरणकर्त्याने गज्जम यांना तेथेच सोडून पळ काढला.
गज्जम यांचा आवाज ऐकून त्यांच्या ओळखीचे पुजारी हरिकृष्ण नल्ला, श्रीनिवास नल्ला, बाळकृष्ण माशम तसेच इतरजण आले. त्यावेळी घडला प्रकार त्यांनी त्यांना सांगितला. याप्रकरणी गज्जम यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अनोळखी चार अपहरकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन दिवसांनतरही अपहरणकर्ते मोकाट
सूत व्यापारी गज्जम यांच्या अपहरणाचा प्रयत्न होऊन तीन दिवस उलटले. अपहरणाची घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तरीही पोलीस आरोपींपर्यंत पोहचण्यास उशीर होत असल्याने लोकांमध्ये अपहरणकर्ते मोकाट असल्याबाबची चर्चा रंगत आहे. परंतु, बिहार स्टाईलने सोलापुरात व्यापाऱयाच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याने व्यापारी वर्गात मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे.